नंदुरबार- घरातून निघून जावे, यासाठी दुसऱ्या पत्नीने व नवऱ्याने मारहाण करीत पहिल्या पत्नीला थेट विजेेेचा धक्का देऊन मारण्याचा प्रयत्न केला. जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीतून ही धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी पहिल्या पत्नीला शॉक देणाऱ्या नवरोबासह त्याची दुसरी पत्नी आणि त्याचे वडील यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
लक्ष्मी तिरसिंग पटले,रा.तळोदा असे पीडित महिलेचे नाव आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचे पती मुकेश जयसिंग खर्डे आणि त्यांची दुसरी पत्नी गीता खर्डे यांनी आमच्या घरातून निघून जा, असा तगादा लावून मानसिक शारीरिक त्रास देणे चालवले होते. यातूनच पती मुकेश व त्याची दुसरी पत्नी गिता हिने शिवीगाळ करुन हाताबुक्यांनी मारहाण केली. तर आमचे घरातुन निघुन जा असे सांगुन सासरे जयसिंग यांनीही शिवीगाळ करुन ढकलून दिले. नंतर संध्या ७ वा. सुमारास पती मुकेश व त्याची दुसरी पत्नी गिता हिने फिर्यादीचा हात धरुन घरातील इलेक्ट्रीक बल्ब सॉकेट जवळ ओढत नेले. तेव्हा शॉक लागल्याने लक्ष्मी खर्डे या जमीनीवर पडून बेशुध्द झाल्या. शुध्दीवर आल्यावर पाठीवर जखम झाल्याचे त्यांना लक्षात आले. मालदा,ता.तळोदा येथे मुकेश खर्डे यांच्या राहत्या घरी दि. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.