जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी काढले आदेश
नंदुरबार – ‘कोविड- 19’ प्रतिबंधात्मक नियमांमधून जिल्हा कारागृह देखील मुक्त करण्यात आले असून नियमांचे पालन करून बंदिवान नातेवाईक व वकिलांना भेटू शकतील; असा आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाच्या अध्यक्षा मनीषा खत्री यांनी आदेश दिले आहेत.
कोविड-19 संदर्भात केंद्र सरकार, राज्य शासन, जिल्हा प्राधिकरण आणि स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवेळी दिलेल्या आदेशांचे तसेच मार्गदर्शन सूचनाचे पालन करणे बंधनकारक असेल. कोविड प्रतिबंधात्मक सर्वसाधारण उपाययोजनांसाठी संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून नियमानुसार आवश्यक सर्व खबरदारी व उपाययोजना कारागृहाने कराव्यात. बंदिवानाच्या भेटीच्या वेळी सामाजिक अंतर राखणे, स्वच्छतेच्या निकषांचे पालन करणे, चेहऱ्यावर मास्क लावणे बंधनकारक राहील. प्रत्यक्ष भेटी दरम्यान ‘कोविड-19’ च्या संदर्भातील तसेच कारागृह नियम पुस्तिकेतील सर्व मागदर्शक तत्वांचे, नियमाचे पालन करणे बंधनकारक असेल.
बंदिवानाच्या भेटीवेळी खोलीचे निर्जंतुकीकरण करावे, प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्कॅनिंग, हॅण्डवॉश, सॅनेटायझरची व्यवस्था करावी. प्रत्यक्ष, समक्षभेटी नंतर इंटरकॉमचे फोन रीसिव्हर सॅनेटायझर करणे आवश्यक असेल. ‘कोविड 19’ साथरोग संबंधित सर्दी, खोकला, ताप, श्वसन संस्थेशी संबंधित लक्षणे असणाऱ्या नातेवाईक, वकील, नियुक्त कर्मचाऱ्यांना बंदिवानांची भेट घेण्यास प्रतिबंध करावा. ज्या बंदिवानांने ‘कोविड-19’ ची लस घेतलेली नाही, त्यांच्यासाठी कारागृह अधीक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्याने पूर्ण करावे. तसेच कारागृहात नियुक्त कर्मचाऱ्यांसह पोलिस सुरक्षा रक्षक यांचे देखील लसीकरण करावे. कारागृहात ‘कोविड-19’ विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव होणार नाही या दृष्टिकोनातून आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
00000