नंदुरबार – कोरोनामुळे तब्बल दीड वर्षानंतर प्रथमच ऑफलाइन झालेली आजची नंदुरबार नगरपालिकेची सर्वसाधारण सभा शाब्दिक चकमक आणि आरोप-प्रत्यारोप होऊन मोकाट गुरांसह वॉटर ऑडिट आणि विविध विषयांवर गाजली. अशातच संतप्त विरोधी नगरसेवकांनी सभात्याग केला. तथापि या गदारोळानंतर नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली 18 विषयांना मंजुरी देण्यात आली.
दरम्यान पत्रकारांशी वार्तालाप करताना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी या सभेविषयी बोलताना विरोधकांवर अत्यंत प्रखर टीका केली. रघुवंशी म्हणाले की, ज्यांना अवैध मद्य वाहतूक आणि रेमडिसिवर विक्रीतून पैसा कमवायचा आहे त्यांना पाणीपुरवठा विषयावर बोलण्याचा अधिकार नाही. अमळनेर नगरपरिषद निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होणार असल्याने माजी आमदार शिरीष चौधरी यांनी तिकडे लक्ष देणे अपेक्षित आहे; तथापि येत्या काळात वेल्डिंग नाही झाले तर लढाई निश्चित आहे अशा शब्दात मिश्किलपणे रघुवंशी यांनी चिमटा काढला. हाती असलेला पाणीसाठा नागरिकांना योग्य स्वरूपात देण्याची जबाबदारी सांभाळून नगरपालिकेने नियोजन केलेले आहे. खरी गरज उन्हाळ्यात असते म्हणून त्यावेळी कपात न करता नेहमीप्रमाणे एक दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन आहे, असे रघुवंशी म्हणाले. मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर असला तरी नगरपालिके प्रमाणेच नागरिकांची देखील जबाबदारी आहे. गोरक्षकांनी त्यावर येता-जाता नगरपालिकेला दोष देण्याऐवजी मोकाट गुरांच्या मालकांचे प्रबोधन करून नागरिकाचे कर्तव्य निभवावे, ही अपेक्षा ठेवून मी गोरक्षकांवर टीकात्मक बोललो होतो, असे स्पष्ट करीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी कृषी समिती आवारात व सिंधी कॉलनीतील बंद पडलेल्या शाळा आवारात मोकाट जनावरांना बंदिस्त करण्यासाठी कोंडवाडा बनवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली.
नंदुरबार नगर परिषदेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. सभेला उपनगराध्यक्ष रवींद्र पवार उपस्थित होते. मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांच्या जागी अभियंता गावित यांनी कामकाज पाहिले. संजय माळी यांनी इतिवृत्त वाचून सभेला प्रारंभ केला. शहराच्या मंजूर विकास योजनेतील नगरपालिका मालकीच्या सिटी सर्वे नंबर 10 99 चे शाळेसाठी असलेले क्षेत्र प्राथमिक वाणिज्य प्रयोग करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. रेल्वे स्टेशन रस्त्यावरील हॉटेल शर्मा ते उत्तरेस रेल्वे रस्ता कॉंक्रिटीकरण व ड्रेनेज लाईन कामासाठी 18 लाख 87 हजार 865 रुपये अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. नंदुरबार नगर परिषद हद्दीतील मोकाट गुरे पकडली त्यांची कोंडवाड्यात वाहतूक करण्यासाठी खर्चास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक तीन मधील मोहन ट्रेडर्स पासून नगर पर्यंत तसेच रामकृष्ण नगर या भागात रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी 49 लाख 74 हजार रुपये खर्चास मंजुरी देण्यात आली. आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. शेवटी नगरपालिकेच्या विरोधी गटातील नगरसेवकांनी नगराध्यक्षां ऐवजी सत्ताधारी नगरसेवक बोलत असल्याच्या कारणावरून नगराध्यक्षा यांचा अवमान होत असल्याचे सांगून सभात्याग करीत दालना बाहेर निघून गेले. शहरातील मोकाट गुरांमुळे व्यापाऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करीत विरोधी पक्षाचे नगरसेवक चारुदत्त कळवणकर आणि प्रशांत चौधरी यांनी सभाग्रुहात गदारोळ केला. यावर नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी पालिकेसह नागरिकांची देखील जबाबदारी असल्याचे सांगितले.