नंदुरबार – आपल्या शासकीय सेवेचे दिर्घ टप्पे ओलांडून मिळणारी पदोन्नती ही शासकिय कर्मचारी विशेषतः पोलीस अंमलदारांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस हवालदार संजय नागो बडगुजर व पोलीस हवालदार बबन बापु पाटील हे सहा. पोलीस उप निरीक्षकपदी पदोन्नतीस पात्र असूनदेखील काही प्रशासकीय तांत्रीक अडचणींमुळे पदोन्नतीपासून वंचित होते. त्याबाबत त्यांनी आज पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्याकडे आज्ञांकीत कक्ष घेतला होता. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदर विषय अत्यंत गांभिर्याने घेऊन दोन्ही पोलीस हवालदार यांचे समक्षच पदोन्नतीची फाईल मागवून घेतली. त्यातील प्रशासकीय तांत्रीक अडचणींवर तात्काळ निर्णय घेऊन तासाभरात दोन्ही पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उप निरीक्षकपदी पदोन्नती दिली. तसेच त्यांचे पुष्पगुच्छ व पदोन्नतीचे आदेश हाती देऊन पदोन्नतीबद्दल हार्दिक अभिनंदन केले.
पदोन्नती झालेले पोलीस हवालदार संजय नागो बडगुजर व पोलीस हवालदार बबन बापू पाटील यांना त्यांची दिर्घकाळापासून रखडलेली पदोन्नती इतक्या जलद गतीने निर्णय घेऊन पदोन्नती मिळेल यावर विश्वासच बसला नाही. त्यांना त्यांचा पदोन्नतीचा आदेश हातात मिळाल्यानंतर आनंदाश्रू आवरता आले नाहीत. पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक यांचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील पोलीस अंमलदारांचे कोणतेही प्रश्न जलद गतीने
सोडविले जातील तसेच पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या कल्याणाकडे वैयक्तीक लक्ष देणार असल्याचे सांगितले. गृह उपाधीक्षक वळवी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे निरीक्षक कळमकर हेही याप्रसंगी उपस्थित होते.