नंदुरबार – जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे नंदुरबार जिल्हा हद्दीतील 753 ब क्रमांकाच्या शेवाळी ते नेत्रंग या राष्ट्रीय महामार्गाचा नंदुरबार ते तळोदा दरम्यानचा भाग रस्ता म्हणून जराही शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे हे अंतर पार करणे जड वाहनांपासून दुचाकी धारकांपर्यंत सगळ्यांनाच दिव्य वाटू लागले असून शब्दशः हा रस्ता जीवघेणा बनला आहे. एवढी वाईट स्थिती डोळ्याने दिसूनसुद्धा त्या रस्त्यावरून नियमित धावणारे आमदार, खासदार आणि अधिकारी निष्क्रिय व बेदखल कसे काय राहू शकतात? असा प्रश्न करीत वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याच्या दुर्दशेला जबाबदार असलेल्या ठेकेदारांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करणे तर दूर जाब विचारणे सुद्धा आमदार, खासदार करेनासे झालेत. लोकप्रतिनिधींना इतके निष्प्रभ करणारे संबंधीत ठेकेदार कशामुळे ईतके प्रभावी आणि ‘पॉवर’फुल बनले? हा प्रश्न सामान्य वाहतूकदारांना पडला आहे.
नंदुरबार हद्दीतील शेवाळी ते नेत्रंग राष्ट्रीय महामार्गावरून मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक करणारी वाहने दिवस-रात्रर मोठ्या संख्येने धावत असतात. अक्कलकुवा, तळोदा आणि धडगाव या तालुक्यांमध्ये भेटी देण्यासाठी अथवा कामकाजा निमित्त अनेक अधिकारी कर्मचारी तसेच लोकप्रतिनिधी देखील याच रस्त्याचा वापर करत असतात. महामार्गाचा त्या तालुक्या लगतचा भाग बरा असला तरी निझर ते नंदुरबार एवढा रस्ता प्रचंड खराब झाला आहे. विशेषतः तळोदा नंदुरबार दरम्यान वाका रस्ता कमालीचा खराब आहे.
‘तारेवरची कसरत’ करताना ज्याप्रमाणे पावलोपावली तोल सांभाळावा लागतो अगदी तशी गत या रस्त्यावरून वाहन काढणाऱ्यांची असते. मात्र या मार्गावरून रोज ये-जा करणारे अधिकारी व पदाधिकारी त्यावर ब्र शब्द सुद्धा बोलत नाहीत. या महामार्गाच्या दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नसल्यामुळे स्थानिक रहिवासी तसेच रोज वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून रोज संतापाची भावना उमटतात.
स्थानिकांचे म्हणणे आहे की रोज या मार्गावर लहान-मोठे अपघात होतात. कोणीही याकडे लक्ष का देत नाही? हे न उलगडणारे कोडे बनले आहे. या महामार्गामुळे त्रासलेले लोक मोठे आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. अथवा मोठी सामुहीक प्रतिक्रिया उमटू शकते; अशी शक्यताही दिसत आहे.