नवी दिल्ली – चार वर्षाच्या आणि त्या आतील वयाच्या मुलांना दुचाकीवरून बसवून न्यायचे असेल तर यापुढे त्या बालकांनाही हेल्मेट घालणे अथवा सुरक्षा उपकरण वापरणे बंधन कारक राहणार आहे शिवाय लहान मुल दुचाकीवर असताना ताशी 40 पेक्षा अधिक वेगाने दुचाकी चालवणे गुन्हा ठरणार आहे.
मोटार वाहन कायद्याच्या तरतुदीनुसार मंत्रालयाने हा नवीन नियम तयार केला असून 21 ऑक्टोबर रोजी जारी केला आहे.
याविषयी शासनाकडून देण्यात आलेल्या माहितीत म्हटले आहे की, मोटार वाहन कायद्याच्या कलम 129 मध्ये मोटार वाहन (सुधारणा) कायदा 2019, दिनांक 9 ऑगस्ट 2019 द्वारे दुरुस्ती करण्यात आली आहे. या कलमातील दुसरी तरतूद आहे -“चार वर्षांखालील मुलांनी मोटार सायकलवरून प्रवास करणे किंवा त्यांना मोटार सायकलवरून नेणे यासाठी त्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार नियम जारी करून त्याद्वारे उपाययोजना करू शकेल.”
यानुसार मंत्रालयाने 21 ऑक्टोबर 2021 रोजी जीएसआर 758(E) द्वारे यासंदर्भातील मसुदा नियम तयार केले असून त्यात शिफारसी समाविष्ट केल्या आहेत. त्या अशा-
- चार वर्षांखालील मुलांसाठी, मोटारसायकल चालकाबरोबर मुलाला बांधण्यासाठी सुरक्षा उपकरणांचा वापर करावा.
- भारतीय मानक विभाग कायदा 2016 अंतर्गत विहित केलेले हेल्मेट उपलब्ध होईपर्यंत 9 महिने ते 4 वर्षे वयाच्या लहान बालकाने त्याच्या डोक्यावर स्वतःचे हेल्मेट घातले आहे जे त्याच्या डोक्याला बरोबर बसेल आणि ते सायकल हेल्मेट [ASTM 1447]/ [European (CEN)BS EN 1080/ BS EN 1078] चे मानकांचे पालन करणारे असेल याची मोटारसायकल चालकाने खातरजमा करावी.
- 4 वर्षापर्यंतच्या मुलासह प्रवास करणाऱ्या मोटारसायकलचा वेग ताशी 40 किमी पेक्षा जास्त नसावा.

