अपात्रतेविषयीचा ‘तो’ ठराव रद्द करा, नगराध्यक्षांसह त्या नगरसेवकांचे सदस्यत्वही रद्द करा; भाजपा नगरसेवकांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नंदुरबार – नंदुरबार नगरपालिकेतील संख्या बळाचा वापर करून विरोधी नगरसेवकांना अपात्र करण्याचा बेकायदीशीर ठराव नगरपालिका अधिनीयम १९६५ च्या कलम ३०८ प्रमाणे रद्द करावा, तसेच हा बेकायदेशीर ठराव केल्याप्रकरणी नगराध्यक्षांसह त्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करावे, यासह विविध प्रकरणी चौकशी आणि कारवाईची मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात दिले.
असंसदीय वर्तणूक करणाऱ्या नगरसेवकांवर कारवाई करावी, अशी मागणी नंदुरबार नगर परिषदेची सर्वसाधारण सभा झाली त्याप्रसंगी सत्ताधारी गटाच्या सर्व नगरसेवकांनी ठरावाद्वारे केली होती तसेच भाजपा नगरसेवकांना उद्देशून असलेले हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन तो ठराव रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील दैनंदिन स्वच्छतेसाठी दिलेल्या ठेकेदारीच्या माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार या सर्व विषयाला कारणीभूत आहे. साफसफाई अभावी जागोजागी उकिरडे साचतात. त्यामुळेच कुत्रे व मोकाट गुरांचा हैदोस शहरात चालतो. परिणामी काही लोक बळी ही पडले आहेत. तरीही विरोधकांकडे मुद्दे नसल्याचे सांगत स्वत:चा भ्रष्टाचार लपवण्याचे प्रयत्न होत आहेत, असा असा आरोप करून निवेदनात पुढे म्हटले आहे की, सत्ताधारींना व त्यांच्या नेत्यांना आम्ही आवाहन करतो की नंदुरबार शहरातील समस्यांकडे लक्ष देवून नगरपालिकेच्या कारभाराचे योग्य नियोजन करावे.
     मागण्या नोंदवताना पुढे म्हटले आहे की, नंदुरबार नगरपालिकेतील संख्या बळाचा वापर करून विरोधी नगरसेवकांना अपात्र करण्याचा बेकायदीशीर ठराव नगरपालिका अधिनीयम १९६५ च्या कलम ३०८ प्रमाणे रद्द करावा, अर्थसंकल्पात तरतुद असलेल्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा पैश्यांचा वापर करत मोकाच कुत्र्यांचा बंदोबस्त करावा,मोकाट गुरांचा प्रश्नाचे नियोजन करावे, नगरपालिकेतील सीसीटिव्ही फुटेज छेडछाड करण्यापुर्वी ताब्यात घ्यावे, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदीराला खाजगी कार्यालय बनवू पाहणार्यांच्या तावडीतून मोकळे करावे, कै. बटेसिंगभैय्या रघुवंशी व्यापारी संकुलातले गाळा क्र १ चे  बेकायदेशीर हस्तांतरण रोखावे, नगरसेवकांना अपात्र करण्याचा बेकायदेशीर ठराव व नगरपालिकेच्या हिताचे निर्णय न घेणाऱ्या नगराध्यक्षा यांना महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम ५१-१-अ व सत्ताधारी नगरसेवकांना  महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ चे कलम ४४ अनन्वे कारवाई करत सदस्यत्व रद्द करणे व नगरपालिकेच्या यापुढील सर्व सभांना पोलीस बंदोबस्त देवून नगरपालिकेचे कामकाज निर्भयपणे चालवावे; असेही निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना भाजपा नगरसेवक व विरोधी पक्ष नेते चारूदत्त कळवणकर,आनंद माळी,प्रशांत चौधरी,पृथ्वीराज जैन,संगिताताई सोनवणे,सिंधुबाई माळी,कमल ठाकुर,संगिताताई वसईकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!