नंदुरबार – शहरातील धुळे चौफुलीवरील ‘लव नंदुरबार’ फलकासमोर एक युवक हिरव्या रंगाचा झेंडा फिरवित असल्याची व्हिडीओ क्लिप ही भारत पाकीस्तान क्रिकेट मॅचच्या दिवशी चित्रीत झाली असल्याच्या अफवेसह मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर प्रसारीत केली जात होती. परंतु
नंदुरबार शहर हे संवेदनशिल शहर असुन सदर व्हिडीओमुळे दोन धर्मात तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मा. पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सदर व्हिडीओ चित्रीत करणाया इसमाचा शोध घेऊन त्याचेकडे सखोल चौकशी करणेबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना आदेश केले.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी पथकामार्फत लगेचच इसमाचा शोध घेतला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता तेली अमन आशिक हुसेन वय ३१ वर्ष रा. गाझी नगर, नंदुरबार असे नाव त्याने सांगितले. त्यास स्थानिक गुन्हे शाखेत आणून त्याचे मोबाईलची तांत्रीक तपासणी केली. तेव्हा या तरुणाने ईद ए मिलादच्या दिवशी दिनांक १८/१०/२०२१ रोजी रात्री ११.०८ वाजता हिरवा इस्लाम धर्माचा झेंडा फिरवितांनाचा व्हिडीओ चित्रीत केला असल्याचे निष्पन्न झाले. व्हिडीओ चित्रीत करण्यामागे त्याचा कोणताही गैरहेतू नसल्याचे चौकशीत समोर आले आहे. सदर व्हिडीओचा भारत पाकीस्तान क्रिकेट सामन्याशी कोणताही संबंध नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर सदर व्हिडिओ भारत पाकीस्तान क्रिकेट सामन्याशी संबंधीत असल्याची अफवा असामाजिक तत्वांकडून सामाजिक तेढ निर्माण होण्याचे उद्देशाने प्रसारीत करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये सामाजिक सलोखा न बिघडविता शांतता ठेवावी. तसेच कोणी दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करीत असेल तर त्याचेवर योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई देखील केली जाईल असे आवाहन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.