नंदुरबार – जिल्ह्यातील शहादा तालुक्यात कळंबू परिसरात तसेच लगतच्या गावांमध्ये काल गुरुवार दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वर्षभराच्या अंतराने त्याच भागात ही घटना घडली यामुळे स्थानिक लोकांमधून चिंता व्यक्त करणारे प्रश्न उपस्थित होऊ लागली आहेत.
अधिक माहिती अशी की, शहादा तालुक्यातील कळंबूसह परिसरातील हिंगणी, तोरखेडा ,दोंदवाडा, फेस, बामखेडा, वडाळी, कुकावल, कोठली, सारंगखेडा, टेंभा आदी गावांमध्ये आज दुपारी 3.58 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 2.3 रिष्टर स्केल भूकंपाची नोंद गांधीनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मॉलॉगिकल रिसर्च सेंटर मध्ये करण्यात आली आहे. यात कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही. तथापि नंदुरबार जिल्ह्यात भुकंपाचे असे वारंवार धक्के जाणवायचे कारण काय असावे ? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला असून चिंतेचा बनू पहात आहे.
कारण, काही महिन्यांपूर्वी याच पट्ट्यात भु कंपने जाणवली होती शिवाय जमिनी खचल्याचे पहायला मिळाले होते. एका बंधाऱ्यालगतचीही जमिन त्यामुळे खचली असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. भूकंपाचे धक्के जाणवण्याची वारंवारता वाढत असताना त्यातील दिवसाचे अंतर देखील कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 2001 च्या ऑगस्ट महिन्यात मोठे धक्के जाणवले होते. नंतर थेट जानेवारी 2021 मध्ये जाणवला. मध्यप्रदेशात शनिवार दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी भुकंपाचे दोनदा धक्के बसले होते. मध्यप्रदेशच्या त्याच सीमेलगत महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुकाही त्याचवेळी हादरला होता. शहादा शहर आणि ग्रामीण भागात दुपारी 1 वाजून 24 मिनिटांनी व 1 वाजून 26 मिनिटांनी असे दोन धक्के बसल्याची नोंद झाली होती. जमिनीखाली 5.3 किमि खोलवर व नर्मदा नदीवरील महाकाय सरदार सरोवर धरणापासून 99 किमि अंतरावर त्या भुकंप लहरींचे केंद्र असल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ सेस्मालॉजिकल रिसर्चला त्यावेळी आढळून आले होते.
विशेष असे की, याच्या अवघ्या आठ महिन्यानंतर म्हणजे शनिवार दिनांक 7 ऑगस्ट 2021 रोजी अक्राणी तालुक्यातील धनाजी खुर्द गावात भूकंपाचा धक्का जाणवला होता. गांधीनगरच्या भूकंपशास्त्रीय संशोधन केंद्राने त्यावेळी हा धक्का जमिनीखाली 13.5 किमी खोलवर असल्याचे म्हटले होते . हे ठिकाण नर्मदा नदीवरील महाकाय धरण सरदार सरोवर पासून 56 किलोमीटर अंतरावर आहे. यानंतर अवघ्या अडीच पावणे तीन महिन्याच्या अंतराने म्हणजे काल पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. ही मोठ्या धोक्याची घंटा आहे का ? असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. मध्य प्रदेशचा सीमावर्ती भाग व त्यालगत असलेल्या शहादा तळोदा अक्कलकुवा तालुक्यांच्याा भूगर्भात मोठे बदल घडत आहेत का ? वरच्यावर जाणवूू लागलेल्या भुकंपलहरी त्याचाच परिणाम आहे का ? असेही प्रश्न लोकांच्या मनात घर करू लागले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर भौगोलिक, भौतिक आणि पर्यावरणीय दाखले देत गंभीर ईषारा देणारे मत मेधा पाटकर यांनी काही महिन्यांपूर्वी मांडले होते. गुजरात हायकोर्टात चाललेल्या एका याचिकेचा दाखला देत एक ऑडिओ क्लिप त्यांच्यावतीने व्हायरल करण्यात आली होती. त्या क्लिप मध्ये मेधा पाटकर म्हणतात की, नर्मदा नदीवरील महाकाय सरदार सरोवर धरणाच्या जलाशयाच्या पासून 1400 किलोमिटर्सचा परिसर भूकंपप्रवण क्षेत्र आहे. धरणापासून विविध दिशांना भूगर्भातील फॉल्ट लाईन जातात. 2000 साली कच्छ भागात झालेला तसेच जबलपूर भागात झालेला किंवा मध्य प्रदेशात झालेले छोटे-मोठे भूकंप त्याचाच परिणाम आहे. परंतु राजकीय असंवेदनशीलता सातत्याने भौतिक आणि पर्यावरणीय शास्त्राने मांडलेले वास्तव दुर्लक्षित करीत आली आहे. असे नमूद करून मेधा पाटकर यांनी तत्कालीन त्या क्लिप मध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र हद्दीत तीन रिश्टर स्केलचा भूकंप नोंद होणे ही फार मोठ्या धोक्याची घंटा आहे. भुकंप प्रवणता वाढायला महाकाय सरदार सरोवर धरणाची सदोष निर्मिती कारणीभूत असून महाराष्ट्र सरकारने आता तरी ठोस भूमिका घ्यावी; असेही मत मेधा पाटकर यांनी मांडले आहे. यामुळे सरदार सरोवर धरण आणि त्या लगतच्या नंदुरबार जिल्ह्यातील वाढती भु कंपने चर्चेचा विषय बनला असून त्याकडे अभ्यासकांचे लक्ष वेधले गेले आहे. मेधा पाटकर यांचे हे म्हणणे नाकारणारे किंवा खोडणारे कोणतेही स्पष्टीकरण शासकीय स्तरावरून अद्याप दिले गेलेले नाही.