मताधिकार जागृती करणारे आकाशकंदिल बनवा, रांगोळी काढा अन बक्षीस मिळवा: जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

नंदुरबार : दीपावली उत्सवाच्या निमित्ताने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ‘लोकशाही दीपावली ’ स्पर्धा आयोजित केली असून जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

 

मतदारयाद्यांचे अद्ययावतीकरण आणि मतदार नोंदणीचा नवीन अर्हता दिनांक जाहीर करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने 1 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या https://ceo.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर तसेच मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत 1 जानेवारी 2022 रोजी 18 किंवा अधिक वय असलेले नागरिक आपले नाव मतदार यादीत नोंदवू शकणार आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाची अधिक माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात घरोघरी आकाशदिवा लावला जातो आणि रांगोळी काढली जाते. याच आकाशदिवा आणि रांगोळीच्या माध्यमातून यंदाची दिवाळी लोकशाहीमय साजरी करावी. ‘सक्षम लोकशाहीची पहिली पायरी – मतदार नोंदणी’ हे लक्षात ठेवून आकाशदिवा तयार करताना आणि रांगोळी काढताना नागरिकांनी मतदारयादीत नाव नोंदविण्याचे आवाहन करावे. आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये लोकशाही, निवडणूक, मतदान यासंबंधीच्या विविध प्रतिकांचा वापर करावा. जसे डाव्या हाताचे अंगठ्याच्या बाजूचे शाई लावलेले बोट, मतदान केंद्र, मतदान पत्रिका, ईव्हीएम मशीन इ. वापरावा. शिवाय, मतदार नोंदणी, नाव वगळणी, तसेच मतदारांनी त्यांचे नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, लिंग, मतदार ओळखपत्र इत्यादी तपशील अचूक आहेत हे मतदार यादीत पाहावे, चुकीच्या तपशिलांत दुरुस्त्या कराव्यात याकरिता मतदारांना आवाहन करण्यासाठी आकर्षक घोषवाक्यांचा वापर करावा.

बऱ्याच मतदारांना असे वाटते की, आपल्याकडे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे आपण मतदान करू शकतो. पण तसे नसून मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे. तेव्हा सर्व मतदारांनी मतदारयादीत आपले नाव आणि इतर तपशील तपासून घ्यावेत, तपशिलात बदल असतील तर संबंधित अर्ज भरावा, 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी नाव नोंदणी करावी, या दृष्टीने आकाशदिवा आणि रांगोळी यांच्या माध्यमातून मतदारांना आवाहन करण्यात यावे.

*आकाशदिवा (आकाशकंदील ) स्पर्धा*

आकाशदिवा तयार करण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्य वापरलेले असावे,लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकारी या विषयांना अनुसरून तयार केलेल्या आकाशदिव्याचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत. प्रत्येक फोटो हा जास्तीत-जास्त 5 एम.बी साईजचा व जेपीजी फॉरमॅटमध्येच असावा. तीनही फोटोंची एकत्रित साइज 15 एम.बी पेक्षा जास्त असू नये. फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये. आकाशदिवा स्पर्धेसाठी टांगलेल्या आकाशदिव्याची चित्रफीत पाठवावी, जेणेकरून आकाशदिव्याची सजावट चहुबाजूंनी दिसू शकेल. ही चित्रफीत कमीत कमी 30 सेंकदांची आणि जास्तीत जास्त एक मिनीटांची असावी. आकाशदिव्याच्या चित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त 300 एमबी असावी. तर ध्वनिचित्रफीत एमपी 4 फॉरमॅटमध्ये असावी. आकाशदिव्याची चित्रफीत (व्हिडिओ) अपलोड करताना, चित्रफितीत कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिजाइन, असे अधिकचे काही जोडू नये. चित्रिकरण करताना सजावटीचे वर्णन करतानाचा आवाज मुद्रित (रेकॉर्ड) केल्यास चालेल. आकाशदिवा स्पर्धेंसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकारी या विषयांशी संबंधित आकाशदिव्याचे तीन फोटो आणि चित्रफीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.

*रांगोळी स्पर्धा*

लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे विविध कोनांतून काढलेले तीन फोटो पाठवावेत. प्रत्येक फोटो हा जास्तीत जास्त 5 एम.बी साईजचा व जेपीजी फॉरमॅटमध्येच असावा. तीनही फोटांची साईज 15 एमबी पेक्षा जास्त असू नये.फोटोवर कोणाचेही नाव, लोगो, चित्र, फ्रेम, डिझाईन, असे अधिकचे काही जोडू नये. रांगोळी स्पर्धेसाठी निश्चित केलेल्या लोकशाही, मतदार नोंदणी, मताधिकार या विषयांशी संबंधित रांगोळीचे तीन फोटो पाठवणाऱ्या स्पर्धकांचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल.आकाशदिवा आणि रांगोळी यांमध्ये घोषवाक्यांचा वापर केला असेल तर गुगल अर्जामध्ये ती घोषवाक्ये लेखी स्वरूपातही पाठवावीत.

स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, स्पर्धंकांनी आपले साहित्य 15 नोव्हेंबर 2021 पर्यत https://forms.gle/hHf11MvySTVUmccZ6 या संकेतस्थळावर सादर करावेत. आकाशदिवा आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धकांना प्रथम 11 हजार, द्वितीय 7 हजार ,तृतीय 5 हजार तर उत्तेजनार्थ 1 हजार रुपयांची एकूण दहा बक्षिसे देण्यात येणार आहे. तर साहित्य पाठवणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल. तर विजेत्यांना प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल.आलेल्या साहित्यामधून सर्वोत्तम साहित्य निवडण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी स्पर्धकाची असेल. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या कार्यक्रमांमध्ये आकाशदिवा स्पर्धकांचे साहित्य प्रसारित केले जाईल. तेव्हा उत्कृष्ट आकाशदिवा स्पर्धकांनी आपले साहित्य जपून ठेवावे. कार्यालय आपल्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधेल.स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8669058325 (प्रणव सलगरकर) यांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धकाला आकाशदिवा आणि रांगोळी यांपैकी एका किंवा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल. दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दोन्हींचे साहित्य गुगल अर्जामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे स्वतंत्र विभागात पाठवावे अधिकाधिक स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!