ग्रामीण महिलांच्या आरोग्यरक्षणासाठी डॉ.श्रद्धा शिंदे करताहेत जागृती कार्य

नंदुरबार – ग्रामीण भागात किशोरवयीन मुलींच्या आहार आणि आरोग्य समस्यांबाबत होत असलेली हेळसांड खरोखरीच चिंताजनक असल्याने डॉ.श्रद्धा राजेंद्र शिंदे यांनी खोंडामळी येथील नूतन माध्यमिक विद्यालयात उपस्थित भगिनीवर्गाला जाणीवपुर्वक मार्गदर्शन केले.

डॉक्टर श्रद्धा राजेंद्र शिंदे यांनी ग्रामीण महिला मुलींचे प्रबोधन करण्याचे हे काम उत्स्फूर्तपणे सुरू केले आहे. एका युवतीने जागृतीसाठी असे पुढे यावे ही विशेष उल्लेखनीय बाब आहे. कोणत्याही संस्थेमार्फत अथवा संघटनेच्या माध्यमातून नव्हे तर स्वतः एकट्याने त्यांनी हे एकहाती कार्य सुरू केले आहे. अन्य गावांमध्ये व ग्रामीण भागात भेटी देऊन असे प्रबोधन करण्याचा मानस डॉक्टर श्रद्धा यांनी व्यक्त केला आहे.

ग्रामीण भागात योग्य माहिती व मार्गदर्शन अभावी तरुणी व किशोरवयीन मुली यांना विविध आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो.त्याच बरोबर सामाजिक कुचंबना असल्याने महिला वर्ग मनमोकळेपणे आपल्या आरोग्य विषयक समस्या बोलूनही दाखवत नाही. यामुळे मोठ्या आरोग्यविषयक समस्या उद्भवत असतात. आरोग्य प्रबोधन व्हावे या विचारातून खोंडामळी येथे इयत्ता 6 ते बारावीच्या किशोर्वयीन मुलींसाठी आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.या शिबिरात डॉ. कु.श्रद्धा राजेंद्र शिंदे यांनी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले.आजही मासिक ऋतू धर्मात योग्य ती स्वच्छतेची दक्षता न बाळगता सॅनेटरी पॅड ऐवजी पारंपरिक पद्धती वापरली जाते. यामुळे नानाविध समस्या उद्भवू येत असल्याचे त्यांनी उपस्थित विद्यार्थीनींना समजावून दिले. हार्मोन्समध्ये होत असलेले बदल स्त्रियांच्या स्वभावावर,जीवनावर,परिणाम घडवतात.लैंगिक संप्रेरकांमुळे मासिक ऋतूचक्र सुरु होते,तसेच स्वभावावर, वागणुकीवर,शारीरिक बदलांवर परिणाम होत असतो. याविषयी डॉक्टर शिंदे यांनी उपस्थितांना सखोल माहिती दिली.

या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या डॉ. कल्याणी बच्छाव यांनी वैद्यकीय शिबिरातून किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन घेऊन आपल्या आरोग्याची व परिवाराची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले. कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व भगिनी उपस्थित होत्या. प्राचार्य संजय बच्छाव यांनी संयोजन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!