माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते सत्कार
नंदुरबार – वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमास प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेत येथील वेदांग विलास दाणेज हा 720 पैकी 651 गुण मिळवून जिल्ह्यात अव्वल स्थानी आला आहे. म्हणून हिरा प्रतिष्ठान संचलित शिक्षण संस्थेने मान्यवरांच्या उपस्थितीत संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते वेदांग दाणेज याचा सत्कार करून विशेष कौतुकाची थाप दिली. वेदांग हा सहकार महर्षी श्री.अण्णासाहेब पी.के.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी असून येथील डॉ विलास दाणेज व श्रॉफ हायस्कूलच्या शिक्षिका सुरेखा दाणेज यांचा मुलगा आहे. त्याला 3756 अशी राष्ट्रीय रँक मिळाली आहे. सन 2020-21 शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयातून वेदांग हा 95.83% गुण मिळवून इयत्ता १२वी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आहे.
वेदांगने हिरा प्रतिष्ठान संचलित सहकार महर्षी श्री.अण्णासाहेब पी.के.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या “एकच ध्यास , विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास” या ब्रिदाला साजेसे यश प्राप्त केले असून खुप कौतुकास्पद आहे; असे वक्तव्य याप्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले. वेदांग विलास दाणेज याने 95.83% गुण प्राप्त केले होते.
दरम्यान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब हिरालाल चौधरी, चेअरमन डॉ. रविंद्र हिरालाल चौधरी, कोषाध्यक्ष विजय चौधरी, सचिव रुपेश चौधरी, प्राचार्य महेंद्र फटकाळ, नगर सेवक चारुदत्त कळवणकर, नगर सेवक गौरव चौधरी, माध्यमिक शिक्षक सुरेंद्र पाटील, हे उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे सर्व अन्य पदाधिकारी यांनी गुणवंत व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले तथा पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समस्त प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी वर्ग यांनी देखील विद्यार्थ्याचे कौतूक केले.