.. आणि पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्यामुळे कोरोना शहीद पोलीसांच्या घरी साजरी झाली दिवाळी

नंदुरबार –  नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी कोरोना काळात शहीद झालेल्या पोलीस अंमलदार यांच्या घरी दिवाळी साजरी करण्याची अनोखी संकल्पना अमलात आणली आणि त्यामुळे घरातील कर्ता पुरुष गेलेल्या त्या आमदारांच्या घरात दीपोत्सवाचा आनंद साजरा होऊ शकला.
याचा संदर्भ असा की, कोरोना वायरस महाराष्ट्रासह संपूर्ण जगात पसरला. त्यावेळी सेवा बजावणाऱ्या पोलीसांचा सामान्य जनतेशी सरळ संपर्क आला आणि त्यामुळे त्यांना कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा धोका सर्वात जास्त पत्करावा लागला. कोणत्याही प्रकारचे औषध किंवा लस उपलब्ध नसतांना पोलीसांनी कोरोना सारख्या अदृष्य शत्रुशी दोन हात करुन त्यावर मात केली. एकीकडे ईतर सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवली किंवा 10% कर्मचारी हजर ठेवले होते. संपूर्ण जग लॉकडाऊन होवून घरी बसलेले असतांना पोलीस विभागाला मात्र घरात बसून लॉकडाऊन होता येणार नव्हते तर रस्त्यावर, चौका चौकात रात्रंदिवस तहान भुक विसरून कोरोना विरुध्द् युध्द् करायचे होते. अशावेळी आपले पती, पत्नी, मुलबाळ आई वडील यांच्यापासून दुर राहून जनतेच्या हितासाठी आपले कर्तव्य बजावणारे Front Line Warrior अर्थातच पोलीस.
अशा कोरोना काळात आपले कर्तव्य बजावत असतांना नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील 23 पोलीस अधिकारी व 227 पोलीस अमंलदारांना कोरोनाची लागण झाली होती. सर्व अधिकारी व अमंलदारांनी औषधोपचार घेतले. त्यामुळे ते कोरोना आजारावर यशस्वीरीत्या मात करुन पुन्हा कर्तव्यावर हजर झाले, परंतु 5 पोलीस अमंलदार हे कोरोना आजारावर मात करण्यात अपयशी ठरले. ते पाचही पोलीस अमंलदार कोरोना आजाराने शहीद झाले. यात शहादा पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलले सहा. पोलीस उप निरीक्षक दीपक हरिशचंद्र फुलपगारे हे दिनांक 5 सप्टेंबर 2020 रोजी,  म्हसावद पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले सहा. पोलीस उप निरीक्षक कैलास मधुकर चव्हाण हे दिनांक 2 फेब्रुवारी 2021 रोजी,  सारंगखेडा पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेले असई रमेश शिवराम पाटील हे दिनांक 20 मार्च 2021 रोजी,  सहा. पोलीस उप निरीक्षक मानसिंग बबनसिंग गिरासे हे दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी तर पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार शशिकांत सत्यपाल नाईक हे दिनांक 27 मार्च 2021 रोजी कोरोना विषाणुशी लढत असतांना शहीद झाले.
शहीद झालेल्या या पोलीस अमंलदारांच्या घरी यंदा दिवाळीचे दिवे लागणार नाही कारण त्यांच्या कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोनाशी दोन हात करतांना कर्तव्यावर शहिद झाला होता, त्यांच्या घरात दुःखाचे व निराशेचे वातावरण होते. शहीद झालेले पोलीस अमंलदार हे आपल्याच कुटुंबातील सदस्य होते हे विसरुन न जाता शहिद पोलीस अमंलदारांच्या कुटुंबीयांच्या घरी देखील दिवाळी व भाऊबीज साजरी व्हावी अशी संकल्पना नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी एक कुटुंब प्रमुख म्हणून मांडली.
त्या संकल्पनेवर तात्काळ अमंलबजावणी करुन पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी शहीद पोलीस अमंलदारांच्या कुटुंबीयांच्या घरी जावून त्यांच्या दुःखात सहभागी होत कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. तसेच शहिद पोलीस अमलदारांच्या कुंटुंबीयांसोबत दिवाळी व भाऊबीज साजरी केली.
शहिद पोलीस अमंलदारांच्या कुटुंबीयांचे दुःख कमी करण्याचा एक छोटासा प्रयत्न पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केला. शहीद कुटुंबीयां प्रती असलेली तळमळ व सहानुभुती पाहता शहिद कुंटुंबीयांकडुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या या उपक्रमाचे कौतुक केले असून त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. या कार्याक्रमाच्यावेळी पोलीस उप अधीक्षक (मुख्यालय), नंदुरबार विश्वास वळवी, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री नरेंद्र भदाणे, शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राहुल पवार हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!