नंदुरबार – नवापुर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश होणार असून या प्रवेश सोहळ्यासाठी विसरवाडी येथे आमदार शिरीष नाईक यांच्या पुढाकाराने मंत्री के सी पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच मोठा मेळावा आयोजित केला जाईल अशी माहिती नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी आज दिली.
विसरवाडी ग्रामपंचायतचे सरपंच तथा विसरवाडी भागातील काँग्रेस पक्षाचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे बकाराम गावित हे पक्षांतर करून शिवसेनेत जाणार आहेत. बकाराम गावित हे शेकडो कार्यकर्त्यांसह आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व जिल्हा प्रमुख डॉक्टर विक्रांत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या शिवसेना मेळाव्याप्रसंगी प्रवेश करतील, असे जाहीर करण्यात आले आहे. नवापूर तालुक्यात काँग्रेस पक्षातून होत असलेली गळती या घटनेमुळे अधोरेखित झाली.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आलेला मेळावा म्हणजे हे शिवसेनेला प्रतिउत्तर असू शकते; असा कयास लावला जात आहे. नवापूर तालुका काँग्रेस अद्याप मजबूत असल्याचा संदेश देत काँग्रेस पक्षाकडून शक्तिप्रदर्शन घडवले जाण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी जाहीर केलेल्या माहितीत म्हटले आहे की, विसरवाडी परिसरातील कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी आणि नवापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या पुढाकारात लवकरच विसरवाडी (तालुका नवापुर) येथे शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेशाचा सोहळा पालक मंत्री तथा आदिवासी विकास मंत्री नामदार के सी पाडवी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची तारीख आणि वेळ नंतर कळविण्यात येईल; असेही दिलीप नाईक यांनी म्हटले आहे.
दिलीप नाईक यांनी एनडीबी न्यूज वर्ल्ड शी बोलताना असेही स्पष्ट केले की, कोणाला प्रतिउत्तर द्यावे म्हणून हा मेळावा घेण्यात आलेला नाही. हा पूर्वनियोजितच कार्यक्रम आहे. परंतु जिल्हा परिषद पोटनिवडणूकीमुळे आणि आता दिवाळी सणा मुळे तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. तारीख निश्चित केल्यावर सविस्तर जाहीर केले जाईल असेही ते म्हणाले.