नंदुरबार – तालुक्यातील रनाळे गावातील बस स्थानक परिसरात भर रस्त्यावर दोन्ही हातात दोन तलवारी घेऊन एका तरुणाने धुमाकूळ घातला. शिवाय दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. मात्र वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णव तांबोळी (वय वर्षे 28) नामक तरुणाने 6 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी बस स्थानक परिसरात अचानक हातात दगड घेवून आरडाओरड करायला सुरुवात केली. आधी रागाच्या भरात त्याने स्वतःची रिक्षा उलटवली. काही वेळ धिंगाणा घातला. नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आलेल्या नोंदीनुसार वैष्णव यांने त्याप्रसंगी नंदुरबार ते शिरपुर जाणाऱ्या MH २० BL ०९१२ या क्रमांकाच्या बसच्या समोरील काचेवर दगड फेकून मारला. त्यामुळे बसची समोरील काच फुटली. रस्त्यावरील लोकांमध्ये त्यामुळे घबराट पसरली त्याचबरोबर या प्रकाराने प्रवासी देखील घाबरले. थोडयावेळाने वैष्णव हा दोन्ही हातात दोन तलवारी घेवून आला आणि आरडाओरड करून धुमाकूळ घातला. बस चालक राकेश विजयसिंग राऊळ, रा- शुभम नगर, देवपुर, धुळे यांनी ताबडतोब तालुका पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी येऊन वैष्णव यास लगेच ताब्यात घेतले. अधिक तपास पोलीस पोलीस कॉन्स्टेबल सामुद्रे करीत आहेत. हा आरोपी मनोरुग्ण असून त्या भरात त्याने हे कृत्य केले आहे, असे पोलिसांच्या तपासाअंती निष्पन्न झाले. १००० रुपये किमतीच्या २ तलवारी त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे.