नंदुरबार – काँग्रेस कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश घेत असले तरी महा विकास आघाडी जैसे थे राहणार असून शिवसेना आघाडी धर्म निभावत राहील. यापूर्वीदेखील नंदुरबार जिल्हा काँग्रेसला संकटकाळात शिवसेनेचे सहकार्य लाभले आहे तसे ते यापुढेही लाभत राहील; अशा शब्दात शिवसेनेचे जिल्हा नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षांतर कार्यक्रमांमुळे आघाडीची बिघाडी होणार नसल्याची ग्वाही दिली.
नवापुर तालुक्यातील विसरवाडी भागातील अनेक आजी माजी सरपंच आणि कार्यकर्त्यांसमवेत काँग्रेसचे निष्ठावान प्रमुख कार्यकर्ते तथा विसरवाडी चे सरपंच बकाराम गावित यांनी आज रविवार दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्या सोहळ्याला संबोधित करताना शिवसेनेचे जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी बोलत होते. नवापुर तालुका काँग्रेसला शिवसेनेने या पद्धतीने खिंडार पाडल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते याकडे कसे बघतात ? महा विकास आघाडीला यामुळे धक्का लागेल काय ? याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झाली. अशातच काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार असून लवकरच विसरवाडी येथे मेळावा आयोजित करु; असे जाहीर केले. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी धर्माविषयी केलेले वक्तव्य महत्त्वाचे ठरले आहे.
शिवबंधन हाती बांधल्यानंतर प्रमुख भाषण करताना बकाराम गावित म्हणाले की, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित हे आजही माझ्यासाठी भगवान आहेत. त्यांचे मी आशीर्वाद घेतले; तथापि हे नेते आता सक्रिय नाहित. शिवाय 2014 पासून मला बाजूला ठेवले जात होते, अशी खंत व्यक्त करून बकाराम गावित म्हणाले की, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात शिवसेनेसाठी यापुढे सदैव काम करणार आहे.
तोच धागा पकडून चंद्रकांत रघुवंशी प्रमुख भाषणात म्हणाले की, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक आणि ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचे आशीर्वाद घेऊनच मी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी आनंद व्यक्त केला होता. आजही त्यांना मी तितकेच मानतो. तथापि विकासाचे काम करायचे असेल तर सत्ता हेच प्रमुख साधन असते. शिवसेना हा खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचा विचार करणारा पक्ष आहे; असे सांगून चंद्रकांत रघुवंशी पुढे म्हणाले की, शिवसेना नेहमीच काँग्रेसच्या मदतीला धावून आली आहे. नवापुरात शिरीषकुमार नाईक यांना आमदार बनवण्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे. याचा इन्कार ते स्वतः करूूू शकणार नाहीत. महा विकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एक आहोत. जिल्हा विकासासाठी एकत्रित काम करत राहू.
दरम्यान, बकाराम गावित हे भविष्यात नवापूर विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचे उमेदवार असू शकतात, असे शिवसेनेचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख दीपक गवते भाषणात म्हणाले. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एडवोकेट राम रघुवंशी यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विसरवाडीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले.
विसरवाडीतील या पक्षांतर सोहळ्याला जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच यांच्यासह सामान्य नागरिकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. शिवसेनेचे संपर्कप्रमुख दीपक गवते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एडवोकेट राम रघुवंशी, जिल्हा परिषद सदस्या ज्योती पाटील यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.