नंदुरबार : महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. एक वर्षापूर्वीच या जागेवर पोटनिवडणूक झाली होती व त्यात माजी मंत्री तथा भाजपाचे ऩेते अमरीश भाई पटेल हे निवडून आले होते. भारतीय जनता पार्टी कडून अमरीश भाई पटेल हेच पुन्हा उमेदवार राहणार असल्याचे स्पष्ट आहे. शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी या निवडणुकीत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले असून अमरीश भाई पटेल यांना मागील प्रमाणे यंदाचा विजय सहज सोपा असेल किंवा नाही याविषयीचे गणित आणि तर्क मांडणे सुरू झाले आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघाची मुदत 1 जानेवारी, 2022 रोजी पूर्ण होत आहे. या रिक्त होणा-या जागेकरिता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला असून आजपासून आचार संहिता लागू झाली आहे. या मतदार संघासाठी शुक्रवार, दिनांक 10 डिसेंबर, 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. मंगळवार, 14 डिसेंबर, 2021 रोजी मतमोजणी होणार असून गुरुवार, 16 डिसेंबर, 2021 पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी मनीषा खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
या निवडणुकीची मागील पार्श्वभूमी थोडक्यात अशी की, धुळे-नंदुरबार विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल हे काँग्रेस पक्षात होते. तथापि या आमदारकीचा 1 जानेवारी 2022 पर्यंतचा कालावधी बाकी असतांनाच 2019 मध्ये राजीनामा देऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता व त्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. म्हणून या जागेवर डिसेंबर 2020 ला पोटनिवडणूक घेण्यात आली. निवडून येणाऱ्या व्यक्तीला एकच वर्ष कार्य करण्यासाठी मिळेल हे स्पष्ट असून सुद्धा त्यावेळी राजकीय रस्सीखेच झाली. अमरीश भाई यांना बिनविरोध होऊ द्यायचे नाही या भूमिकेतून महाा विकास आघाडीतर्फे शहाद्याचे अभिजीत पाटील यांनी उमेदवारी केली होती. प्रत्यक्षात मतपेटीवर मात्र केवळ औपचारिकता पार पाडली गेल्याचे दिसले होते. धुळे नंदुरबार विधानपरिषदेच्या त्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अमरिशभाई पटेल यांनी 437 पैकी 332 मते मिळवून विजय प्राप्त केला होता तर महा विकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना अवघे 98 मते मिळाली होती. 4 मते बाद झाली होती. काँग्रेस पक्षाची मते सुद्धा सहज सोप्या पद्धतीने अमरीश भाई यांनी मिळवली होती.
परंतु आताची निवडणूक अमरीश भाई यांना मागील प्रमाणेच सहज सोपी राहील का ? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण शिवसेनेचे नंदुरबार जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी हे अमरीश भाईंसमोर आव्हान उभे करू शकतात, असा कयास लावला जात आहे. पटेल यांना तुल्यबळ लढत देऊ शकणारे एकमेव नेते म्हणूनही रघुवंशी यांच्याकडे पाहिले जाते. कार्यकर्त्यांना असे जाणवण्याला धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या चालू असलेल्या निवडणुकीची पार्श्वभूमी कारणीभूत आहे. बँकेची ही निवडणूक बिनविरोध करण्याचा अमरिशभाई पटेल यांचा प्रयत्न होता. परंतु शिवसेनेच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार नंदुरबार जिल्हा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी जागा लढवण्याचा पवित्रा जारी ठेवला. परिणामी दोन्ही नेत्यांमधील तेढ वाढली आहे. त्याच वेळी मंत्री के सी पाडवी यांनी पटेल यांना अनुकूल भूमिका घेतली.
जर रघुवंशी यांनी विधान परिषद निवडणुकीतही याच भूमिकेत राहून हालचाली केल्या तर अमरीश भाई यांना आव्हानात्मक होऊ शकते; असा एक मतप्रवाह आहे. परंतु प्रत्येक निवडणूक महा विकास आघाडी म्हणून हाताळण्याचे संकेत असल्यामुळे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी अशी कडक भूमिका घेऊ शकतात किंवा नाही ? याविषयी मंत्री के सी पाडवी यांचा रघुवंशी यांना प्रतिसाद मिळेल किंवा नाही ?
हे पुढे पाहायला मिळेल. आजच निवडणूक घोषित झाली आहे व अद्याप महा विकास आघाडी घटक पक्षांची त्यावर एकत्रित बैठक होणे बाकी आहे. काँग्रेस पक्षाचे जिल्हा नेते पालक मंत्री एडवोकेट के सी पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे यांची भूमिका त्यानंतर स्पष्ट होईल.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे च मतदान अधिक संख्येने असल्यामुळे उमेदवार द्यावा किंवा नाही, तसेच उमेदवारी कोणाला द्यावी ? याविषयी महाविकास आघाडीचा निर्णय काँग्रेस पक्षावरच अधिक अवलंबून राहील असे दिसते. ज्यांनी पोटनिवडणुकीत मतदान केले तेच मतदार आताही कायम राहणार आहेत. ती एकूण 437 मते होती. पण वर्षभरात स्थिती काहिशी पालटली आहे. जसे की, मृत्यू झाल्यामुळे काही मतदार कमी झालेत. तर साक्री येथे प्रशासक बसल्याने तेथील मतदार घटले. ही स्थिती अमरिशभाई यांच्या पथ्यावर पडणारी असल्याचा दावा अमरीश भााई समर्थकांकडून केला जात आहे.
दरम्यान नंदुरबार जिल्हा शिवसेना नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एनडीबी न्यूज वर्ल्ड शी बोलताना सांगितले की, महा विकास आघाडी जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील. आघाडीच्या नेत्यांशी बोलणे बाकी असल्यामुळे आम्ही निराळी भूमिका घेऊ शकत नाही. निवडणूक आजच घोषित झाली आहे व राज्यस्तरीय वरिष्ठांशी यावर बोलणे बाकी आहे. तिनी पक्षांचे वरिष्ठ ठरवतील तोच निर्णय आम्हाला मान्य राहील, असेही रघुवंशी यांनी स्पष्ट केले.