नर्मदाकाठी बुडालेल्या तरंगत्या दवाखान्याचे अखेर उजळले भाग्य; दुरुस्तीसाठी पाऊण कोटीची तरतूद?

नंदुरबार – तरंगता दवाखाना म्हणून वापरात असलेली कोटी रुपये किमतीची बार्ज मणीबेली येथील नर्मदानदीच्या पात्रात दुरुस्ती अभावी सुमारे चार वर्षांपासून बुडालेल्या अवस्थेत पडून आहे. कोटी रुपयांची ही बार्ज भंगारात काढली जाण्याची शक्यता बळावली असतांनाच मात्र आता तिचे भाग्य अचानक उजळले आहे. नंदुरबार जिल्हापरिषदेने भल्या मोठ्या तगड्या खर्चाची तरतूद करीत बार्ज दुरुस्तीची प्रक्रिया गतीमान केली आहे.

जिल्ह्यातील नर्मदा काठच्या अतीदुर्गम भागात सरदार सरोवरमुळे विस्थापित झालेल्या गाव परिसरातील आदिवासी जनतेला तत्परतेने आरोग्यसेवा देता यावी तसेच साथीच्या आजारासारखे प्रसंग उदभवल्यास जागेवरच उपचार देता यावे; या उद्देशाने नर्मदा काठावर तरंगते दवाखाने फिरते ठेवण्याची संकल्पना २००५ च्या दरम्यान मांडली गेली. युरोपियन कमिशनने कोटी रुपये किमतीच्या दोन बार्ज यासाठी दिल्या आणि प्रत्यक्षात दोन तरंगते दवाखाने २००६ साली येथील आरोग्यसेवेत दाखल झाले. आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि आवश्यक औषधसाठा त्यावर उपलब्ध ठेवला जाऊ लागला. दरम्यान अलीकडच्या काही वर्षात एनआरएचएमच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने आणखी तीन तरंगते व फिरते दवाखाने म्हणजे अशा बार्ज नर्मदा काठी सुरु केल्या. सध्या हे तीन नवे आणि जुनी एक असे चार तरंगते दवाखाने सुस्थितीत चालू असल्याचा दावा केला जातो.

परंतु काही आवश्यक दुरुस्त्या करून मिळाल्या नाही यामुळे युरोपीयन कमिशनने दिलेल्यापैकी दोन्ही बार्ज नादुरुस्त आहेत. पैकी एक बार्ज तर ऑक्टोबर २९१७ पासून अक्षरश: जलसमाधी मिळालेल्या अवस्थेत गेली चार वर्ष झाले मणीबेलीच्या नदीपात्रात पडून आहे. अनेक महिने पाण्यात बुडालेल्या अवस्थेत राहिल्याने त्या बार्जचे अनेक किमती महागडे अवशेष सडून भंगारमधे रुपांतरीत झाले. नंदुरबार जिल्हापरिषदेने कोटी रुपये किमतीची मालमत्ता अशी दुर्लक्षीत ठेवल्याबद्दल काही सदस्यांनी वेळोवेळी संतप्त भावनाही मांडल्या. नर्मदा काठच्या त्या भागातील जिल्हापरिषद सदस्या वसावे यांनी जिल्हापरिषदेकडे पत्रव्यवहार करून अनेकदा दुरुस्तीची मागणी केली. परंतु दखल घेतली गेली नाही.

प्राप्त माहितीनुसार, प्रारंभी २००६ ला या दोन बार्ज मिळाल्यानंतर इंधनाच्या आणि कर्मचार्‍यांच्या पगार खर्चाची तरतूद नर्मदा प्राधीकरणाकडून केली जायची. बार्जच्या देखभालीसाठी नंदुरबार जिल्हा परिषदेकडून जी तरतूद केली जाणे आवश्यक होते, ती मात्र कधीच केली गेली नाही. त्यामुळे दोन्ही बार्जची योग्य देखभाल वेळच्या वेळी होऊ शकली नाही. त्यातील तांत्रिक बिघाड वाढत जाऊन अतीदुर्गम भागात नर्मदा काठावर दिल्या जाणार्‍या आरोग्य सेवेवर देखील परिणाम होत राहिला. अशातच पुरेसे तांत्रिक प्रशिक्षण नसल्या कारणाने ती बार्ज ठोेेकली जाऊन तळाकडून छिद्र पडण्याचा व थेट नादुरुस्त होऊन एकाच जागी महिनोन महिने पडून राहण्याचा प्रसंग उदभवला. नंतर ती मणिबेली च्या काठावर आणून ठेवण्यात आली. तिथे छीद्रावाटे बार्जमधे घुसलेल्या पाण्यामुळे तिच्या अन्य सुस्थितीतील पार्ट आणि विभाग भंगार होत गेले. अखेर जलसमाधी मिळाल्यागत मणीबेली येथील नर्मदा पात्रात ती भिजत पडून राहिली. ऑक्टोबर २०१७ पासून अद्याप पर्यंत ही बार्ज दुरुस्तीच्या प्रतिक्षेतच उभी आहे. दुर्गमभागात प्रभावीपणे तत्पर आरोग्यसेवा देवू शकणारी कोटी रुपयांची मालमत्ता अशी सडत पडल्याचे शल्य बोचून कोणाही जबाबदार पदाधिकार्‍यांकडून वेगाने हालचाली करण्याची कृती घडली नाही.

दरम्यान, दुरुस्तीसाठी जहाज बांधणीशी संबंधीत तांत्रिक जाणकारांची त्यासाठी गरज होती. ते उपलब्ध होत नसल्याने तसेच खर्चाची तरतूद करून मिळत नसल्याने आतापर्यंत बार्ज दुरुस्तीला विलंब झाल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले. आता काही दिवसांपूर्वीच जहाज बांधणी संबंधीत अभियंत्यांनी नर्मदाकाठी येऊन बुडालेल्या स्थितीतील बार्जची पाहणी केली. काही खर्चिक उपाय केल्यानंतर ही बार्ज पुन्हा वापरात येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. दुरुस्तीचा अंदाजीत खर्च ७५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या आठवड्यात जिल्हापरिषदेने दुरुस्तीच्या सर्व कागदप्रक्रियांना गती दिली. म्हणूनच ७२ लाख रुपयांचे अनुदान २०२१-२२ च्या पीआयपीमधे म्हणजे प्रोजेक्ट इम्प्लिमेन्ट प्लान अंतर्गत बार्जच्या दुरुस्तीसाठी मंजूर झाले असल्याचे समजते. एकूणच भंगारात निघू पहाणारी बार्ज दुरुस्त करण्याला तब्बल चार वर्षानंतर एकदाचा मुहूर्त लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!