निवडणूक कामकाज प्रशिक्षणासाठी अरुण आनंदकर नियुक्त; प्रशिक्षण देणारे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी

 

नाशिक नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर हे पंजाब मधील वरिष्ठ अधिकारी वर्गास २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी कायदे, नियम व कार्यपद्धती याबाबत प्रशिक्षण देणार आहेत. विशेष म्हणजे भारत निवडणूक आयोगाने नेमलेल्या देशभरातील एकूण ३ अधिकाऱ्यांपैकी अरुण आनंदकर हे महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी आहेत.

सदर प्रशिक्षण वर्ग १५ नोव्हेंबर २०२१ ते १८ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत पंजाबमधील पतियाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय स्तरावरील निवडणूक विषयक तज्ज्ञ तथा मार्गदर्शक अधिकारी म्हणून अरुण आनंदकर हे परिचित आहेत. सन २०२१ मधील पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी तेथील अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या प्रक्षिणाची जबाबदारी सुद्धा त्यांना देण्यात आली होती. उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे  आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकत्याच पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गातही त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण दिले होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून त्यांनी नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात काम करीत असताना अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रम राबविले. या कामाची दखल भारत निवडणूक आयोगाने घेत त्यांच्या अनेक संकल्पना देश पातळीवर राबविल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यात २०१९ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया अतिशय यशस्वीरित्या व अत्यंत कमीत कमी खर्चात राबविताना निवडणुकीमधील अनावश्यक खर्चाला त्यांनी मोठ्या प्रमाणावर कात्री लावली होती आणि या निवडणुकीत १९६७ नंतर मागील ५२ वर्षांनंतरच्या सर्वाधिक मतदानाची नोंद झाली होती.महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक,तेलंगाणा,मध्य प्रदेश, राजस्थान,उत्तर प्रदेश तसेच दिल्ली येथे देशभरातील विविध राज्यांच्या शेकडो वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांनी निवडणूक विषयक प्रशिक्षण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!