नंदुरबार – देशातील व महाराष्ट्रातील काही भागात अप्रिय घटनेच्या अनुषंगाने धार्मीक भावना भडकविणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट खोट्या बातम्या प्रसारीत करणारे ऑडीओ/व्हिडीओ तसेच संदेश सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. अशा प्रकारच्या पोस्ट ऑडीओ/व्हिडीओ तसेच फोटो फॉरवर्ड करु नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी सायबर सेल व नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने केले आहे.
त्रिपुरा राज्यात घडलेल्या कथीत घटनेवरून महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी काही समूहांकडून हिंसक प्रकार घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, अशा आक्षेपार्ह पोस्ट प्राप्त झाल्यास त्या त्या समाज माध्यमांवर तात्काळ रिपोर्ट करावे. सामाजिक शांतता भंग करणारे समाजविघातक व्हिडीओ पोस्ट फोटो संदेश सोशल मिडीयावर व्हायरल करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा प्रकारच्या पोस्ट/ व्हिडीओ / फोटो/संदेशवर लक्ष ठेवण्याबाबत फेसबुक, इंन्स्टाग्राम व्टिटर व्हॉट्सअॅप इत्यादी सर्व सार्वजनिक माध्यमांना कळविण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी पुढे म्हटले आहे की, सोशल मिडीया व इंटरनेटच्या माध्यमातुन पोस्ट करतांना सामाजिक भान ठेवत माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००० (IT ACT २०००) मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. व्हॉट्सअॅप वापरणारे / गृपमध्ये असणारे सर्व सदस्य विशेषतः गृप अॅडमिन्सने आपल्या ग्रुपमध्ये अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट किंवा व्हिडीओ प्रसारीत होणार नाहीत याची विशेषत: दक्षता घ्यावी. अन्यथा तसा संदेश पाठविणाऱ्यावर संबंधीत कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल.
नंदुरबार जिल्ह्यात देखील अशा आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी अशा आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत केल्यास संबंधीत इसमावर व ग्रुप अॅडमिनवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच फेसबुक, इंन्स्टाग्राम व्हॉट्सअॅप व्टिटरवर अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट दिसुन आल्यास तात्काळ सायबर सेल नंदुरबार (02564-210111 Ext.403) नियंत्रण कक्ष नंदुरबार (02564-210113) यावर किंवा आपल्या नजिकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधुन माहीती द्यावी.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाकडून सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे धार्मीक भावना भडकविणारे व खोट्या बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करु नये. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अशा प्रकारचे आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करतांना कोणीही आढळून आल्यास त्याची माहीती त्वरीत नजिकच्या पोलीस ठाण्यात देण्यात यावी, असेही आवाहन केले आहे.