पुन्हा घरफोडी; ‘चप्पल-दगड’ गँग घडवतेय कारनामा ? ‘टारगेट’ बनल्याने हादरलेत शिक्षक

नंदुरबार (योगेंद्र जोशी) –  मध्यरात्री आणखी एका घरात दरोडा टाकून चोरांनी सोने व रोख रक्कम लुटून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आतापर्यंत तीन शिक्षकांकडे चोरी झाल्यामुळे चोऱ्या करणाऱ्या टोळीने शिक्षकांची घरे लक्ष बनवलीत की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, चोरी केलेल्या घरात चप्पल दगडाची निशाणी सोडून जाणारी ही गॅंग आहे तरी कोणती ? हाही प्रश्न चर्चेत आला आहे.
या घटनेविषयी पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाने दुपार पर्यंत फिर्याद दिलेली नव्हती. जगताप वाडी पासून विमल हाऊसिंग पर्यंतच्या परिसरात काही ठिकाणी घरफोड्या झाल्या परंतु संबंधितांनी पोलिसांकडे फिर्याद दिलेली नाही असे स्थानिक नागरिकांच्या चर्चेतून समजते.

काही वर्षापासून राज्यात चड्डी-बनियन गँग चर्चेत आहे. प्रत्येक टोळीची मोडस अपरेन्डी म्हणजे गुन्ह्यातील विशिष्ट पद्धत पोलिसांकडून अभ्यासली जात असते. त्यातूनच असे आढळले होते की, त्यांची नक्कल करून अन्य चोरांनी देखील दिशाभूल करण्यासाठी चड्डी-बनियनचा वापर केेला. नंदुरबार जिल्ह्यात अचानक दिवाळी संपत असतानाच घरफोड्या, चोऱ्या यांच्या घटना वाढल्या आहेत. त्यात काही विशिष्ट पद्धत आढळली काय ? याचे संदर्भ तपासण्याचे आव्हान आहे. मागील आठवड्यात भर दिवसा सहारा टाऊन हॉल परिसरात शिक्षकांची घरे फोडल्याच्या घटना घडल्या. त्या घटना ताज्या असतानाच आणखी एका शिक्षकाच्या घरी चोरी करून चोरांनी आव्हान उभे केले.

स्थानिक नागरिकांनी याबाबत दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आज रविवार दिनांक 14 नोव्हेंबर 2021 रोजी पहाटे  शिवाजीनगर -2 या कॉलनीत ही घटना घडली. नंदुरबार शहादा बायपास रस्त्यापासून काही अंतरावर विमल हाऊसिंग परिसरात टेकड्यांलगत ही काँलनी आहे. येथील एक रहिवासी यांच्या वडिलांचे निधन झाले म्हणून ते परिवारासह बाहेरगावी गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होते व ही संधी टोळीने साधली. चोरीची वार्ता कळताच आज सकाळी घरमालक धावत आले. पहाटे अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान लोखंडी हत्यारे हातात असलेले 5 हून अधिक जण आले आणि त्यांनी कडीकोयंडे तोडून प्रवेश केला असावा, असा अंदाज घरात झालेल्या तोडफोडीवरून लावला जात आहे. संबंधितांना असेही निदर्शनास आले की, घरातील अन्य कोणत्याही गोष्टीला दरोडेखोरांनी हात लावला नाही. फक्त घरातील कपाटे फोडली. किती ऐवज चोरीस गेला, याची यादी बनवण्याचे काम ही बातमी लिहून होण्याच्या दरम्यान चालू होते. शहर पोलिस एपीआय मोहिते यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी हजर झाले. त्यांनी पाहणी केली. ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु संबंधित व्यक्तीनेे फिर्याद दिली नसल्यामुळे चोरीस गेलेल्या रकमेचा तपशील अधिकृत समजू शकला नाही.

      दरम्यान, रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी झालेल्या या घरात दोन ठिकाणी चोरांनी चपलेचा जोड आणि चार दगड ठेवलेले आढळले. याच्या आधी ज्या शिक्षकांकडे चोरी झाली तेव्हा देखील चपलेचा जोड आणि सोबत दगड ठेवलेले आढळून आले होते, असे समजते. यामुळे ही टोळी जाणीवपूर्वक अशी खूण सोडून जात असल्याचे दिसते. यामागे टोळीचा हेतू काय असावा ? हा प्रश्न केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!