(योगेंद्र जोशी)
ज्यांची दिव्यता विद्वत्ता बघून आपोआपच हात जोडले जावे आणि माथा झुकवून ज्या चरणांवर नतमस्तक व्हावेसे आपसूक वाटावे; असे ऋषीतुल्य थोर इतिहास संशोधक शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे वयाची शंभरी गाठत असतांनाच आज पहाटे जग सोडून निघून गेले. संपूर्ण महाराष्ट्रात कधीही भरून न निघणारा रितेपणा जाणवावा आणि जाणते नागरिक दु:खी कष्टी व्हावेत, अशीच ही दु:खद घटना आहे. समर्पितभावाने अस्सल विचारकार्य रचणार्या असामान्य व्यक्तींना दुर्दैवाने कुठल्यातरी विवादाशी जोडलेल्या दुषित दृष्टीकोनातून पहाण्याचा अलीकडे घाणेरडा प्रघात पडला आहे. यामुळे, बाबासाहेबांच्या जाण्याने एवढे व्यथीत होण्यासारखे काय आहे ? हा प्रश्न काही छचोर बुध्दीच्या लोकांना पडू शकतो. तथापि आकाशा एवढे विशाल, समुद्रासारखे अथांग आणि हिमालयाएवढे महान व्यक्तीमत्व काय असते; हे बाबासाहेब पुरंदरे यांचा जीवनपट पाहिल्यावर नक्कीच जाणवते. एकाच व्यक्तीच्या ठायी ईतक्या प्रकारची अफाट विद्वत्ता, ज्ञान, आकलनशक्ती, स्मरणशक्ती, समर्पणभाव आणि कार्यशक्ती एकवटलेल्या असू शकतात; हेच मुळात आश्चर्य करायला लावणारे आहे. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टीळक यांच्या समान गणले जावे, ईतकी व्यापक बहुअंगी कार्य-विचार क्षमता बाबासाहेबांकडे ठासून भरलेली पहायला मिळते.
समर्पित भावाने व्यापलेली त्यांची कार्य बहुलता ईतकी आहे की, बाबासाहेब आज आपल्यात राहिले नाहित, या शब्दांमधून ‘महाराष्ट्राचं भूषण निघून गेले, एक महापर्व संपले..’ असाच विशाल संदर्भ ध्वनीत व्हावा ! कारण घराघरात आणि मनामनात छत्रपती शिवरायांचे कार्य पोहचवून धर्मरक्षण आणि धर्माभिमानाविषयी खरोखरचा जागर घडवण्याचे त्यांनी केलेले कार्य ऊत्तूंग आहे. असले उत्तूंग हिमालया एवढे ऐतिहासिक कार्य करणारी महाराष्ट्रातील जी बोटावर मोजण्या ईतकी नावं आहेत, त्यातील बाबासाहेब पुरंदरे हे नाव अग्रणी आहे. महाराष्ट्राच्या नवतरुणांमधे जो शौर्यरस निर्माण झालाय आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या धमन्यांमधून जो शिवरायांचा विचार धावतोय, तो केवळ बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे आणि संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या विचारकार्यामुळेच. जुने जाणतेच नव्हे तर गावोगावचे लाखो नवतरुण आज बाबासाहेब पुरंदरे यांच्या अथांग कार्यातून, लेखनातून प्रेरणा घेतांना दिसतात. त्यांनी केलेले इतिहास संशोधन, त्यांनी रचलेली विपूल ग्रंथ संपदा आणि जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून मनामनात छत्रपती शिवराय कोरण्याची त्यांनी केलेली अदभूत किमया पाहिली, की पुरंदरे यांना शतदा नमन करून कृतज्ञता व्यक्त करावीशी का वाटते? या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.
विद्वत्तेबरोबरच त्यांना दानशुरताही लाभली होती. बाबासाहेबांना पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिदागीतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. महाराष्ट्रभूषण या सन्मानाबरोबर दहा लाख रुपयांतले फक्त दहा पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी पंधरा लाख रुपये घालून ती सर्व रक्कम कॅन्सर हॉस्पिटलला त्यांनी दान केली. संपत्तीचा संग्रह करीत स्वार्थाची लाळ गाळणारे आजचे राजकीय मंचावरील जाणते राजे यांच्या पासंगालाही पुरणार नाहित, हे येथे जाणवते. शिवचरित्र घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाखाहून अधिक घरांमध्ये पोहोचल्या आहेत. छत्रपती शिवरायांचे कार्य लोकांच्या मनात ठसवण्याचा ध्यास एवढा की, बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर २०१५ सालापर्यंत बारा हजाराहून अधिक व्याख्याने दिली. जाणता राजा हे महानाट्य लिहून त्याचे दिग्दर्शनही केले. जीवंत हत्ती, घोडे वापरून राजदरबारासह घोडदळ, पायदळ यांचे जीवंत देखावे समाविष्ट असलेल्या महाविशाल मंचावरील हे पहिले महानाट्य ठरले व देशात एक निराळा ईतिहास घडवून गेले. शेकडो कलाकारांचे जीवन त्यातून घडले. शिवकाळाची अनुभूती देणार्या महानाट्याची आत्तापर्यंत मराठी, हिंदी, तामीळ अनेक भाषांमध्ये शेकड्याने प्रयोग झाले शिवाय लंडन सारख्या विदेशातील नामांकित सभागृह देखील गाजवून आले. ‘जाणता राजा’चा एक प्रयोग अमेरिकेमध्येही झाला होता.
बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करतांना हेही सांगणे आवश्यक ठरते की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर सहभागी होते. भटकंती करीत शेकडो गडकिल्ल्यांची खडा न खडा माहिती मिळवली होती. अशा या महान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. या दिव्य आत्म्यास शतश: नमन आणि भावपूर्ण श्रध्दांजली !
बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख करतांना हेही सांगणे आवश्यक ठरते की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळविण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब पुरंदरे हे सुधीर फडके यांच्याबरोबर सहभागी होते. भटकंती करीत शेकडो गडकिल्ल्यांची खडा न खडा माहिती मिळवली होती. अशा या महान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज सोमवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ या दिवशी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. या दिव्य आत्म्यास शतश: नमन आणि भावपूर्ण श्रध्दांजली !
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने शिवहतिहासाचा ” जाणता संशोधक ” हरपला.
बाबासाहेबांची अद्वितीय बुद्धिमत्तेची व्याख्याने आणि अतुलनीय कार्य व निर्मित ग्रंथ सदैव मार्गदर्शन करतील.
विनम्र अभिवादन!🌹 भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏
© प्रा.पुरुषोत्तम पटेल
🙏🌺🌻