नंदुरबार – तालुक्यातील मालपुर फाट्याजवळ वन विभागाच्या कक्ष क्र.४३७ मधील विहरीत नग्न अवस्थेतील तरुणाचा मृतदेह फेकलेल्या स्थितीत आढळून आला यामुळे खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दि.६ नोव्हेंबर २०२१ ते दि. १4 नोव्हेंबर २०२१ च्या सकाळी १० वाजे दरम्यान एका नग्न अवस्थेतील तरुणाचा मृतदेह एका कापडी चादरीमध्ये बांधून वैदाणे ते मालपुर डांबरी रोडलगत असलेल्या राखीव वनक्षेत्र कक्ष क्र. ४३७ मधील पुरातन विहरीत टाकलेला आढळून आला. ही माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक कमलेश चौधरी व पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर सामुद्रे यांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. मयताचे नाव संजय राजेंद्र मोरे (पाटील) वय २९ रा शनिमांडळ ता जि. नंदुरबार असे निष्पन्न झाले. अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरुन यातील मयत संजय राजेंद्र मोरे (वय २९) रा शनिमांडळ यास जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्यासाठी विहिरीत टाकले असावे की अन्य ठिकाणी मारून मग त्याचा मृतदेह विहिरीत टाकला असावा ? याचा पोलीस शोध घेत आहेत. हेड काँन्स्टेबल ज्ञानेश्वर सामुदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.