नवी दिल्ली – झारखंडमधील भगवान बिरसा मुंडा मेमोरियल पार्क आणि संग्रहालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रमुख भाषणात अनेकदा स्थानिक आदिवासी भाषेत संबोधन केले. शिवाय देशभरातील आदिवासी तरुणांना उद्देशून विशेष आवाहन केले. यामुळे देशात प्रथमच साजरा होत असलेल्या जनजाति गौरव दिनी आदिवासी समूह विशेष प्रभावित होताना दिसला.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमात भाषणाच्या प्रारंभी मान्वरांचा नामोल्लेख करून पंतप्रधान म्हणाले, झारखंड सरकारचे इतर मंत्री, खासदार, आमदार, देशभरातील माझ्या आदिवासी बंधू-भगिनींनो, विशेषत: झारखंडमधील माझ्या मित्रांनो, जोहार! आदिवासी भाषेतून म्हणाले, “हागा ओड़ो मिसि को, दिसुम रेआ आजादी रेन आकिलान माराग् होड़ो, महानायक भोगोमान बिरसा मुंडा जी, ताकिना जोनोम नेग रे, दिसुम रेन सोबेन होड़ो को, आदिबासी जोहार!”
भारतातील आदिवासी परंपरा, त्यांच्या शौर्यगाथा यांना देश अधिक भव्य ओळख देईल, असा निर्धार या देशाने केला आहे. या अनुषंगाने हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे की, आजपासून देशभर दरवर्षी 15 नोव्हेंबर म्हणजेच भगवान विरसा मुंडा यांचा जन्मदिवस ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाईल. पुढे आदिवासी भाषेत मोदी म्हणाले, “इन आड़ी गोरोब इन बुझाव एदा जे, आबोइज सरकार, भगवान बिरसा मुंडा हाक, जानाम महा, 15 नवंबर हिलोक, जन जाति गौरव दिवस लेकाते, घोषणा केदाय!”
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, देशाचा हा निर्णय आज भगवान बिरसा मुंडा आणि आपल्या आदिवासी स्वातंत्र्यसैनिक, शूर वीरांच्या चरणी मी श्रद्धेने अर्पण करतो. या निमित्ताने मी देशाच्या कानाकोपऱ्यातील सर्व आदिवासी बंधू-भगिनींना आणि आपल्या देशवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो. मुंडा यांचा ‘उलगुलान’चा विजय ही इतिहासाची सामान्य लढाई नव्हती. ‘उलगुलान’ ही पुढील शेकडो वर्षांसाठी प्रेरणा देणारी एक घटना होती. म्हणूनच आज जेव्हा आपण आदिवासी समाजाला देशाच्या विकासात सहभागी होताना पाहतो, पर्यावरणाच्या बाबतीत जग आपल्या भारताचे नेतृत्व करताना पाहतो, तेव्हा आपल्याला भगवान बिरसा मुंडा यांचा चेहरा दिसतो, त्यांच्या मस्तकावरचा त्यांचा आशीर्वाद जाणवतो. “आदिवासी हुदा रेया, अपना दोस्तुर, एनेम-सूंयाल को, सदय गोम्पय रका, जोतोन: कना ।”
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, संपूर्ण आदिवासी भागाचा इतिहास पाहिला तर बाबा तिलका मांझी यांनी इंग्रजांविरुद्ध जोरदार आघाडी उघडली होती. सिद्धो-कान्हू आणि चंद-भैरव या भावांनी भोगनाडीहून संथाल युद्धाचा बिगुल फुंकला होता. तेलंगा खाडिया, शेख भिखारी आणि गणपत राय यांच्यासारखे सेनानी, उमरावसिंग टिकैत, विश्वनाथ शाहदेव, निलांबर-पितांबरसारखे वीर, नारायण सिंग, जत्रा ओराव, जदोनांग, राणी गुइदिनलू आणि राजमोहिनी देवीसारखे वीर, असे अनेक स्वातंत्र्यसैनिक होते, ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले. काही बलिदान देऊन त्यांनी स्वातंत्र्य लढा पुढे नेला. या महान आत्म्यांचे हे योगदान विसरता येणार नाही. त्यांच्या गौरवगाथा, त्यांचा इतिहास आपल्या भारताला नवा भारत बनवण्यासाठी ऊर्जा देईल, असे सांगून मोदी म्हणाले, मी विशेषतः आदिवासी तरुणांना आवाहन करतो की, तुम्ही पृथ्वीशी जोडलेले आहात. तुम्ही या मातीचा इतिहास तर वाचलाच, पण तो बघायला, ऐकायला आणि जगायलाही आला आहात. त्यामुळे देशाच्या या संकल्पाची, ईतिहास लेखनाची जबाबदारी स्वतःच्या हातात घ्या !