नंदुरबार – राज्यात सर्वत्र विविध व्यवसायांना शासनाने मुभा दिली परंतु अद्याप डिजे साऊंड सिस्टिमला परवानगी दिलेली नाही. आता ऐन लग्नसराईत तरी साऊंड सिस्टीम व्यावसायिकांना परवानगी द्यावी, अन्यथा लाक्षणिक उपोषणाला बसू ; असा इशारा आई तुळजाभवानी साऊंड डीजे असोसिएशनतर्फे देण्यात आला आहे.
या संदर्भात प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांना आई तुळजाभवानी साऊंड डीजे असोसिएशनने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व साऊंड (डीजे) व्यवसायिक राज्य शासनाच्या सुचनांना अनुसरून कोरोना नियमांचे पालन करीत तुळशी विवाह नंतर जिल्ह्यातील विविध विवाह समारंभ आणि इतर कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तथापि पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी परवानगी पत्रा विषयी विचारणा होऊ लागली आहे. दीड वर्षापासून साऊंड (डीजे )व्यवसाय बंद असल्याने अनेक कुटुंबाची उपासमार होत आहे. हे लक्षात घेता राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांच्यामार्फत परवानगी पत्र उपलब्ध करून द्यावे व या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. अन्यथा जिल्ह्यातील सर्व साऊंड (डीजे) व्यवसायिक नंदुरबार शहर पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसतील, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर आई तुळजाभवानी साऊंड असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष पंडित माळी, उपाध्यक्ष किरण चव्हाण, अशोक मराठे, सचिव राकेश कापडे, सहसचिव दर्शन चौधरी,खजिनदार शैलेश पवार, तसेच खंडू माळी,धीरज कुवर,वरूण चव्हाण, रवींद्र अहिरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.