छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र घराघरात पोचविणारे व लहानांपासून मोठ्यांपर्यंत शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग त्यांच्या लेखणीतून जिवंतपणे उभे करणारे श्री बळवंत मोरेश्वर पुरंदरे म्हणजेच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होय. पद्मविभूषण व महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला होता. सात दशके इतिहास संशोधनाचे अलौकिक कार्य करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे बारा हजाराहून अधिक व्याख्याने देत छत्रपती शिवाजी महाराजांचे अलौकिक व्यक्तिमत्व गल्लीपासून सातासमुद्रापलिकडे सर्वांपर्यंत सहज व सोप्या भाषेत पोहोचविले. त्यांच्या साहित्यसंपदेत छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू आपल्याला उलगडतात. प्रामुख्याने ‘जाणता राजा’ या गाजलेल्या ऐतिहासिक नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले, ‘सावित्री’, ‘जळत्या ठिणग्या’, ‘मुजर्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंद-यांचा सरकारवाडा’ ‘शनिवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाच सोन’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदरऱ्यांची नौबत’ आदी साहित्य प्रकाशित आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवरायांसाठी व शिव चरित्र जनामनात पोहचविण्यासाठी आपले आयुष्य वाहून घेतले होते. एक आदर्श पुरूष म्हणून छत्रपती श्रीमंत शिवाजी महाराज यांचे त्यांनी वर्णिलेले चरित्र तरुण पिढीला निश्चितच प्रेरणा देणारे, शिवभक्ती व देशभक्ती दृढ करणारे आहे. शिवचरित्र या एकाच विषयावर सतत 80 वर्षे लिहिणाऱ्या व बोलणार्या विश्वविक्रमी लेखक, दिग्दर्शक, अभिनेता, संशोधक व छत्रपती शिवाजी महाराज या एकाच मंत्राने झपाटलेले व्यक्तिमत्व म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे. आपल्या लेखणीतून ज्यांनी इतिहास जिवंत ठेवला, छत्रपतींच्या जीवनातील प्रत्येक प्रसंग आमच्या समोर जिवंत करत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रेरणा व स्फूर्ती निर्माण केली.
त्यांच्या स्फूर्तीदायी लिखाणाने आम्हाला शिकविलेले छत्रपतींचे आदर्श नियोजन, व्यवस्थापन कौशल्य, संवाद व सहकार्याची कला, तोड नसलेली निर्णयक्षमता, अप्रतिम नेतृत्व शैली, झुंजार युद्धकौशल्य, स्त्रियांचा सन्मान करून शत्रूनाही आपल्या कर्तुत्वाने जिंकणारै, आदर्श पिता,सहकारी, आज्ञापालक पुत्र व जनतेचा जाणता राजा असे विविध गुण आजही वेगवेगळ्या अभ्यासक्रमातून प्रेरणा देतात.
बाबासाहेबांच्या घरी विविध जाती-धर्माच्या मुलांनी राहून आपले शिक्षण पूर्ण केले त्यांना आई वडिलांच्या मायेने बाबासाहेबांनी सांभाळले. असे सर्वार्थाने शिवमय झालेले बाबासाहेब पुरंदरे यांना शतशः नमन. आई तुळजाभवानी त्यांना सदगती देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना.
– डॉ०. पी. एस. महाजन, संभाजीनगर