शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार : सन 2021-2022 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील अन्नधान्य पिके व गळीतधान्य अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने याबाबींसाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करावे असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातील अन्नधान्य पिके व गळीतधान्य कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात कडधान्य (हरभरा) आणि पौष्टिक तृणधान्य पिकासाठी बियाण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे. हरभरा बियाण्यासाठी दहा वर्षाआतील वाणास 25 रु प्रती किलो, दहा वर्षांवरील वाणास 12 रु प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी दहा वर्षांआतील वाणास 30 रु प्रती किलो, दहा वर्षांवरील वाणास 15 रु प्रती किलो अशा प्रमाणे एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय असेल. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्यांला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय राहील.

पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरुपात अनुदान उपलब्ध होणार आहे. त्यात बियाणे, जैविक खते, सुक्ष्म मूलद्रव्ये, भू-सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला 1 एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार 2 हजार ते 4 हजार प्रती एकर मर्यादेत डीबीटीद्वारे अनुदान दिले जाईल. यासाठी कृषि विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य राहील.

पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क साधून 10 हेक्टर क्षेत्र असणाऱ्या गटांनी 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2021 या कालावधीत नोंदणी करावी. योजनेसाठी शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!