नंदुरबार (योगेंद्र जोशी) – महाराष्ट्रातली पहिली भीम आर्मी पाठशाळा नंदुरबार शहरात चालवली जात असून गरीब दुर्लक्षीत वर्गातील सर्व धर्मीय मुलांना मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. निधर्मी आणि संविधानप्रेमी नागरिक घडावेत यादृष्टीकोनातून त्या मुलांकडून अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला जात आहे, अशी माहिती आज येथे भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय रगडे व भीम आर्मीचे विशेष सहायक प्रा.अमोल पगारे यांनी दिली.
पाठशाळा म्हटली की, अनेकांना वैदिक शिक्षण देणार्या धार्मिक निवासी शाळांचे चित्र डोळ्यासमोर येते. परंतु भीम आर्मीने सुरु केलेल्या पाठशाळा याला अपवाद आहे. भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष संजय रगडे व भीम आर्मीचे विशेष सहायक प्रा.अमोल पगारे यांनी याविषयी अधिक माहिती देतांना सांगितले की, भीम आर्मीचे संस्थापक राष्ट्रीय नेते ऍड.चंद्रशेखर आझाद यांची ही संकल्पना आहे. उत्तर प्रदेशातील काही जिल्ह्यांमधे त्यांनी भीम आर्मी पाठशाळा सुरु केल्या आहेत. त्यांचीच प्रेरणा घेऊन त्याच धर्तीवर नंदुरबार शहरातील गौतमनगरात भीम आर्मी पाठशाळा सुुरु करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात ही एकमेव पाठशाळा आहेच शिवाय महाराष्ट्रात देखील पहिली व एकमेव आहे. पगारे यांनी पुढे सांगितले की, जून २०२१ला म्हणजे सहा महिन्यांपूर्वी या शाळेची सुरुवात करण्यात आली. गरीब, दुर्लक्षीत व आर्थिकदृष्ट्या मागास स्थितीतील सर्व धर्मीय मुलांना त्यात प्रवेश दिला जातो. माध्यमिक-उच्चमाध्यमिक वर्गातील वयापर्यंतच्या मुलांना शिक्षण देण्याची या माध्यमातून सोय होणार आहे. सध्या जवळपास ८० मुलांना याचा लाभ होत आहे; असेही प्रा.पगारे म्हणाले.
अभ्यासक्रम कोणता शिकवला जातो? यावर संजय रगडे यांनी सांगितले की, शिक्षणापासून वंचित गरीब मुलांना योग्य भाषा ज्ञान नसते. म्हणून त्यांना भाषा विषय शिकवणे, गणित विषयाशी संबंधीत सर्व आवश्यक ती प्राथमिक शिकवण देणे, नागरी शास्त्राची माहिती देणे त्याच बरोबर संविधानाची शिकवण देणे, यावर विशेष भर आहे. निधर्मी आणि संविधानप्रेमी नागरिक घडावे, हा यामागचा हेतू आहे; असेही संजय रगडे म्हणाले. अद्याप सर्व काम प्राथमिक स्तरावर असून त्याला व्यापक स्वरुप लवकर देण्याचा प्रयत्न राहिल. तथापि आमच्या या कार्याची माहिती घेण्यासाठी भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.चंद्रशेखर आझाद हे स्वत: नंदुरबार जिल्ह्याच्या दौर्याप्रसंगी या शाळेला भेट देणार आहेत, असे शेवटी रगडे म्हणाले. आझाद हे संविधान जनजागृती यात्रेनिमित्त दि.२३ नोव्हेंबर रोजी नंदुरबार दौर्यावर येत आहेत.