बॉडीबिल्डर विपुल राजपूत यांची ऊल्लेखनीय कामगिरी; पुणे श्री पाठोपाठ राष्ट्रीय स्पर्धेतही रोवला झेंडा

नंदुरबार –  येथील एच.जे.पी.फिटनेस क्लबचे मुख्य संचालक तथा पुणे श्री सुवर्ण पदक विजेते विपुल हेमंतसिंह राजपूत यांनी तेलंगाना (हैदराबाद) येथील नरेश सूर्या क्लासिक एक्स्पो-२०२१ आयोजित राष्ट्रीय बॉडीबिल्डिंग स्पर्धेत कास्यपदक पटकावून आणखी एक भव्य कागगिरी करून दाखवली आहे.  राष्ट्रीय स्पर्धेत चमकणारे विपुल राजपूत हे खानदेशातील पहिले बॉडीबिल्डर ठरले आहेत. आता याहून मोठ्या स्पर्धेत कामगिरी करून दाखवण्याचा मानस असून त्यादृष्टीने तयारी करीत असल्याचे राजपूत यांनी सांगितले.

विपुल राजपूत यांनी काही महिन्यांपूर्वी म्हणजे एप्रिल २०२१ मधेही बॉडी बिल्डिंग फिजिक स्पोटर्स असोसिएशन आयोजित पुणे श्री स्पर्धेत थेट प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक मिळविले आहे. एका अर्थाने नंदुरबारच्याच नव्हे तर खानदेशच्या शरीरसौष्ठव (बॉडी बिल्डिंग) क्षेत्रात विपुल राजपूत यांनी इतिहास रचला आहे. त्यापाठोपाठ मिळवलेल्या राष्ट्रीय स्पर्धेतील यशा मुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, स्वतः विपुल राजपूत यांनी याविषयी पत्रकारांशी संवाद साधतांना सांगितले की, हैदराबाद येथे नरेश सूर्या क्लासिक एक्स्पो २०२१-२२ ही राष्ट्रीय पातळीवरील बॉडी बिल्डिंग (शरीर सौष्ठव) स्पर्धा नुकतीच पार पडली. त्यात ८० ते ९० किलो वजनाच्या गटात मी भाग घेतला होता. ही स्पर्धा तीन दिवस चालते. यादरम्यान स्पर्धकाचे मसल, फिटनेस, शार्पनेस, डाएट कंट्रोल आणि शारीरीक सादरीकरण यांच्या निकषावर आधारित गुण देऊन परीक्षक निवड घोषित करतात. यात देशभरातून विविध राज्यातील ४०० हून अधिक स्पर्धक उपस्थित होते. सर्व स्तरावर ४५० जणांमधून योग्यता सिद्ध करता आली आणि तिसर्‍या क्रमांकाचे कास्य पदक प्राप्त झाले, असे विपुल राजपूत म्हणाले.
बॉडी बिल्डर विपुल राजपूत हे नंदुरबार येथील एच.जे.पी.फिटनेस क्लबचे मुख्य संचालक असूनउद्योगपती हेमंतसिंह जयसिंह राजपूत यांचे कनिष्ठ चिरंजीव, युवा उद्योजक योगेश हेमंतसिंह पाटील यांचे लहान बंधु आणि पत्रकार रत्नदीप पाटील यांचे जावई आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील ते पहिले जीम प्रशिक्षक ठरले आहेत. विपूल यांचे आजोबा जयसिंग मोतिराम राजपूत हे प्रसिद्ध कुस्तीगीर होते. परंतु त्यांच्या घरात नंतर दुसरा कोणी कुस्तीगीर घडला नाही. कारण वडिलांनी व्यवसायाचा व्याप वाढवला. तथापि विपुल यांनी व्यवसायात न रमता  तीच परंपरा जपलेली दिसते. शाळेत क्रीडा स्पर्धांचे पुरस्कार मिळवतानाच व्यायामाची आवड निर्माण झाली. त्यातूनच २०१७ साली नंदुरबार जिल्ह्यातील पहिली एच. जे. पी. फिटनेस क्लब ही खाजगी जीम त्यांनी सुरु केली. नंतर त्यांना बॉडीबिल्डिंग चे आकर्षण निर्माण झाले. मित्रांनी आर्थिक मानसिक बळ दिले शिवाय घरातील सदस्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे मी सलग दुसरी स्पर्धा जिंकू शकलो आहे; असे विपुल राजपूत म्हणाले.
विपुल राजपूत यांना पुणे येथील जीटी फिटनेस क्लबचे सर्वेसर्वा गणेश बोद्दुल यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शरीर सौष्ठव क्षेत्रात कागगिरी करून दाखवता यावी यासाठी विपुल राजपूत हे मागील काही वर्षापासून अथक परिश्रम घेत असतात. स्पर्धेत यश मिळविण्याची मनातून जिद्द होतीच. अखेर त्यासाठी लागणारे सर्व परफॉर्मन्स ठणठणीतपणे सादर करीत विपुल राजपूत यांनी बाजी मारली आणि आयोजकांनी त्यांची तिसर्‍या क्रमांकाने निवड करीत असल्याची दणदणीत घोषणा केली. वास्तविक असे यश मिळवण्यासाठी अनेक लोकांना मोठ्या देणग्या देऊन अथवा बड्या हितसंबंधांना हाताशी धरून पडद्यामागच्या हालचाली कराव्या लागतात. परंतु विपुल राजपूत यांनी फक्त आणि फक्त अंगच्या मेहनतीवर आणि गुणवत्तेवर हे स्थान पटकावले आहे, ही सर्वात अभिमानाची बाब ठरली आहे. राजकीय, प्रशासकीय, सांस्कृतिक तसेच कुस्ती व्यायाम क्षेत्रातील सर्व मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!