इस्लामाबाद – पाकच्या संसदेने बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी नवा कायदा संमत केला आहे. या कायद्यानुसार बलात्कार्याला नपुंसक करण्याची शिक्षा होणार आहे. गेल्या काही महिन्यात पाकमध्ये बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे हा कायदा करण्यात आला आहे.
या कायद्यानुसार देशात विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार असून त्यामध्ये महिला आणि मुले यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या घटनांविषयीची सुनावणी करण्यात येईल. प्रत्येक खटल्याची सुनावणी अवघ्या ४ मासांत पूर्ण केली जाणार आहे. एकदा किंवा अनेक वेळा बलात्कार केलेल्या आरोपीला नपुंसक करण्यात येणार आहे. या वेळी त्याची अनुमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अशा घटनांमध्ये निष्काळजीपणा करणारे पोलीस आणि सरकारी अधिकारी यांना ३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात येणार आहे. पीडितांची ओळख उघड करणार्यांनाही शिक्षा होणार आहे. पाकिस्तानातील माध्यमांचा हवाला देऊन ‘सनातन प्रभात’ने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.