नंदुरबार : ‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा वर्षातून एकदा योग येतो. म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापी काठावरील प्रकाशा येथील कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी रांग लागली.
आज शुक्रवार रोजी दुपारी सव्वा दोन वाजेपर्यंत दर्शनाचा योग असल्यामुळे दर्शनासाठी भाविक घाई करताना दिसले. मात्र एसटी संपामुळे दुरून येणाऱ्या भाविकांना वंचित रहावे लागले तर काहींना जादा भाडे मोजून यावे लागले.
दरम्यान, भाविकांनी कार्तिक स्वामींना मोरपीस अर्पण करीत दर्शन घेत होते. कार्तिक स्वामींना मोरपिस अर्पण करण्याची परंपरा आहे. अशी पण श्रद्धा आहे की, श्री कार्तिक स्वामी यांचा मंत्र कोऱ्या चलनी नोटेवर लिहून रोजच्या पूजेत ठेवल्यास घरात धन, सुख संपन्नता नांदते. यामुळे अनेक भाविक अत्यंत श्रद्धेने श्री कार्तिक स्वामी मंदिराबाहेरील मंत्र नोटेवर अष्टगंधाने लिहून ती नोट मंत्र भारित करताना दिसले. अष्टकोणी घडी घातलेली ही नोट ठेवल्यास घरात शांती आणि संपन्नता आल्याचा अनुभव आल्याचा दावा काही भाविक करतांना दिसले.
षडानन, मुरुगन, महादेवपुत्र, कार्तिकेय, अशा विविध नावांनी श्री कार्तिकस्वामींना ओळखतात. दक्षिण भारतात श्री कार्तिकस्वामींची अनेक मंदिरे आहेत. महाराष्ट्रात मात्र प्रकाशा येथील मंदिर प्रसिद्ध आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजता ब्रह्मवृंदांच्या मंत्रोपचाराने हे मंदिर खुले करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे संचालक रमेश माळीच यांनी मंदिराचे कुलूप उघडले. प्रारंभी मंदिर ट्रस्टच्या वतीने संचालक राजेंद्र मिस्त्री यांनी सपत्नीक पूजा केली. यावेळी मंदिर ट्रस्टी अध्यक्ष दिलीप भिल, अरुण ठाकरे, कैलास माळीच, पिंटू भिल, पुण्या भिल, तसेच भाविक, ट्रस्टी, पोलीस उपस्थित होते. माजी सभापती रामचंद्र पाटील, हरीभाई पाटील यांच्यासह मान्यवरांनी देखील दर्शन घेतले.
प.पु.आसाराम बापू आश्रमाजवळील मार्गावर रस्त्याच्या दूर्दशेमुळे भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून गणेश तुमडू पाटील यांनी दोन जणांसमवेत ठिकठिकाणचे खड्डे बुजवत श्रमदान केले. तथापि कोरोनामुळे येथील यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. या ठिकाणचा महाप्रसाद वाटप व इतर कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले. मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी व्यावसायिकांना दुकानेही थाटू दिलेली नाहीत.
स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते
‘कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र एकत्र असतांना कार्तिकस्वामी दर्शनाचा योग येतो. सर्वसाधारणपणे ‘स्त्रियांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊ नये’, असे मानले जाते; परंतु या दिवशीस्त्रियांनीही कार्तिकस्वामींचे दर्शन घेतलेले चालते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा येथील ज्योतिष फलित विशारद सौ. प्राजक्ता जोशी (वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित आणि हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद) यांनी ही माहिती दिली आहे. या वर्षी गुरुवार, १८.११.२०२१ या दिवशी उत्तररात्री १.२९ पासून १९.११.२०२१ या दिवशी दुपारी २.२८ वाजेपर्यंत कार्तिक पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र आहे. या योगावर कार्तिकस्वामींचे दर्शन घ्यावे. श्री कार्तिकस्वामींचे वाहन मयूर (मोर) आहे. त्याची पूजा करावी. या दिवशी, स्नान करून श्री कार्तिकस्वामींचे दर्शन घेऊन दर्भ, चंदन, फुले, दशांगधूप आणि दीप अर्पण करावा. श्री कार्तिकेय स्तोत्राचे पठण करावे. या स्तोत्राला ‘प्रज्ञावर्धन स्तोत्र’ असेही म्हणतात. या स्तोत्राचे मनोभावे पठण केल्याने मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात आणि बौद्धिक क्षमता वाढते, असेही त्यांनी म्हटले आहे.