नंदुरबार – मोदी सरकारने आज शेतकऱ्यांना गुलाम करू पाहणारे तिन्ही कृषी कायदे रद्द करून एकप्रकारे आपल्या चुकीची कबुलीच दिली आहे. या निर्णयामुळे खूप आनंद झाला असला तरी ही लढाई अजून संपलेली नाही. आता फक्त घोषणा झाली आहे. मोठमोठ्या घोषणा देणे आणि त्या सोईस्करपणे विसरणे याची मोदी सरकारला सवय आहे. त्यामुळे संसदेत हे कायदे रद्द झाल्याशिवाय लढाई संपली, असे म्हणता येणार नाही; अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय किसान समितीच्या सदस्या तथा लोक संघर्ष समितीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे तूर्त रद्द करून दुरुस्तीची प्रक्रिया केली जाईल असे घोषित केले. या पार्श्वभूमीवर ‘लोकसंघर्ष मोर्चा’ने ही प्रतिक्रिया दिली आहे. हे कृषी कायदे रद्द केले जावे यासाठी आंदोलनात त्या सातत्याने सहभागी आहेत.
प्रतिभा शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, ‘किमान हमीभावावर अद्याप सरकारकडून भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. सरकारला किमान हमीभावाचा कायदा बनवावा लागेल. संसदेत तीनही कृषी कायदे मागे घेतले जातील तेव्हाच हे आंदोलन संपुष्टात येईल.
लोकसंघर्ष मोर्चाच्या सीताबाई तडवी यासुद्धा दिली येथे आंदोलनादरम्यान शहिद झाल्या. लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आले. शेतकऱ्यांना आतंकवादी, खलिस्तानी ठरविण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. पण अखेर सत्याचा विजय झाला. देशभरातील शेतकऱ्यांच्या संतापपुढे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. या आंदोलनातील कष्टकरी लोकांची प्रतिनिधी म्हणून या विजयाचा प्रचंड आनंद आहे; असेही प्रतिभा शिंदे यांनी म्हटले आहे.