शेतकऱ्यांनो सुवर्णसंधीचा लाभ घ्या ! कृषिपंप वीजबील माफीसाठी महावितरणने आणली ‘ही’ नवी महायोजना

नंदुरबार (योगेंद्र जोशी) :  कृषिपंपाच्या वीजबिलातील थकबाकीत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाने महा कृषी ऊर्जा अभियानाद्वारे दिली आहे. यात जळगाव परिमंडलातील साडेतीन लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या मूळ थकबाकीमधील जवळपास १९०० कोटी रुपये माफ करण्यात आले आहेत. तर या शेतकऱ्यांनी चालू वीजबिल व सुधारित थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा येत्या मार्च २०२२ पर्यंत भरणा केल्यास आणखी तब्बल १७८९ कोटी रुपयांची माफी मिळणार आहे. 

दरम्यान वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेत सहभाग न घेणाऱ्या व चालू वीजबिलांचाही भरणा न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. महावितरणवरील आर्थिक संकट अतिशय गंभीर असल्यामुळे शेतकऱ्यांनी किमान चालू वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
    राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या महा कृषी ऊर्जा अभियानात कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुमारे ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. या योजनेत जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील ३ लाख ६४ हजार १७३ शेतकऱ्यांकडे ५ हजार ४२२ कोटी ४४ लाख रुपयांची मूळ थकबाकी होती. त्यातील १८९९ कोटी १७ लाख रुपये महावितरणकडून निर्लेखन तसेच विलंब आकार व व्याजातील सवलतीद्वारे माफ करण्यात आले आहेत. तसेच वीजबिलांच्या दुरुस्तीद्वारे ५ कोटी ६१ लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत. आता या शेतकऱ्यांकडे ३५१७ कोटी ६६ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. येत्या मार्च २०२२ पर्यंत त्यातील ५० टक्के म्हणजे १७५८ कोटी ८३ लाख रुपये व चालू वीजबिलांचा भरणा केल्यास उर्वरित १७५८ कोटी ८३ लाख रुपयेही माफ करण्यात येणार आहेत.
आतापर्यंत उत्तर महाराष्ट्रातील ९६ हजार ३६८ शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्तीच्या योजनेत सहभाग नोंदविला आहे. त्यांनी ५६ कोटी ४० लाखांचे चालू वीजबिल व ५५ कोटी ९२ लाख रुपयांच्या सुधारित थकबाकीचा भरणा केला आहे. या सर्व शेतकऱ्यांचे धोरणानुसार व्याज व दंड माफी, निर्लेखनाची सूट तसेच वीजबिल दुरुस्ती समायोजन आणि ५० टक्के थकबाकी माफीचे एकूण ४२१ कोटी २८ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत. या योजनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील ५१ हजार ९८६, धुळे जिल्ह्यातील २७ हजार ७१५ व नंदुरबार जिल्ह्यातील १६ हजार ६६७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
    वीजग्राहकांकडे बिलांची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने महावितरण सद्यस्थितीत अत्यंत कठीण आर्थिक संकटात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषिपंपाच्या चालू वीजबिलांची रक्कम भरणे आवश्यक झाले आहे. योजनेत सहभाग नाही तसेच चालू वीजबिलांचा भरणाही नाही अशा शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचा वीजपुरवठा नाईलाजाने खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे व सोबतच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
१६ हजार २२६ शेतकऱ्यांचे वीजबिल झाले कोरे
या योजनेचा लाभ घेत जळगाव परिमंडलातील १६ हजार २२६ शेतकरी वीजबिलांच्या थकबाकीमधून मुक्त झाले आहेत. या शेतकऱ्यांकडे ८४ कोटी २५ लाख रुपयांची सुधारित थकबाकी होती. त्यांनी ११ कोटी ३५ लाख रुपये चालू वीजबिल व ५० टक्के थकबाकीचे ४२ कोटी १३ लाखांचा भरणा केला व वीजबिल कोरे केले. यात उर्वरित ५० टक्के थकबाकीचे ४२ कोटी १३ लाख रुपये माफ करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!