नंदुरबार – औषधांच्या खोक्यांसमवेत लपवून नेला जाणारा सुमारे 38 लाख रुपयांचा विदेशी मद्य साठा पकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाने तस्करांना मोठा दणका दिला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांनी स्वतः केवळ एका कॉन्स्टेबल समवेत सापळा रचून ही धाडसी कारवाई केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातून गुजरात कडे वाहून नेल्या जाणाऱ्या अवैध मद्यसाठ्याविषयी तक्रारी असल्याने सीमावर्ती भागात तपासणी वाढवण्यात आली आहे. त्याअंतर्गतच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक युवराज राठोड यांना गुप्त माहिती मिळाली त्यावरून त्यांनी अक्कलकुवा तालुक्यात खापर जवळ कोराई शिवारातील महादेव ढाबा परिसरात सापळा रचून नजर ठेवली. त्यावेळी डीडी 01 ए 9519 क्रमांकाचे सहा चाकी आयशर संशयास्पद वाटल्यावरून चौकशी केली. चालक राम स्वरुप बिश्नोई याने औषधाचे खोके दाखवून औषधांच्या बले व कागदपत्र सादर केले. तथापि अधीक्षक राठोड यांनी कसून चौकशी आणि तपासणी केली असता त्या गाडीत 2372 बल्क लिटर विदेशी मद्य आणि 588 बल्क लिटर बियर साठा लपवलेला आढळून आला. गोवा राज्यात निर्मित केलेला व गोवा राज्यात विक्रीची मान्यता असलेला परंतु महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला हा मद्यसाठा 38 लाख 28 हजार दोनशे रुपये किमतीचा असल्याची माहिती अधीक्षक राठोड यांनी दिली. पहाटेपर्यंत ही कारवाई करून चालकास अटक करण्यात आली आहे.