नंदुरबार – भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन उमेदवारी दाखल करताना अमरिशभाई पटेल यांनी अप्रत्यक्षपणे शक्तिप्रदर्शन घडवले. धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी माजी मंत्री अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज भारतीय जनता पक्षातर्फे धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. तर नंदुरबार जिल्ह्यातून नगरसेवक दीपक दिघे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला व तळोदा येथे गौरव वाणी यांनी महाविकास आघाडी तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक नुकतीच पार पडली असून अमरिशभाई पटेल यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. आवश्यक संख्याबळ या गटाकडे असल्याने अमरिशभाई यांना जिल्हा मध्यवर्ती बँके प्रमाणेच ही निवडणूक देखील सोपी असल्याचा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर अमरीश भाई यांचा विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न होता. तथापि जिल्हा मध्यवर्ती बँके प्रमाणेच याही निवडणुकीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे. विधान परिषद निवडणूक त्यामुळे बिनविरोध होईल किंवा नाही याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे. नंदुरबार येथून दाखल झालेली दीपक दिघे यांची उमेदवारी या दृष्टिकोनातून पाहिली जाते. नंदुरबार नगरपालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक दिपक दिघे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला त्याप्रसंगी त्यांच्यासोबत पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक कुणाल वसावे, नगरसेवक परवेज खान उपस्थित होते. गौरव देवेंद्रलाल वाणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष दिलीप नाईक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
तत्पूर्वी धुळे येथे श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस येथे अनेक मान्यवर तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. खा. डॉ. हिना गावित म्हणाल्या, भाईंनी भाजपा मध्ये प्रवेश घेतल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. 2 वर्षे बाकी असतांना भाईंनी आमदारकीचा राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवून ते पुन्हा विजयी झाले. शिस्तप्रिय भाई सर्वांना घेऊन चालतात, ही अभिमानाची बाब आहे. खा. डॉ. सुभाष भामरे म्हणाले, भाईंनी भाजपा मध्ये प्रवेश केला आपण सर्व जण भाग्यवान आहोत. भाई तुमचाच विजय पक्का आहे, आपणांस सर्व पक्षात आदर आहे. भाई महाराष्ट्रात सर्वात जास्त मतांनी निवडून येतील.
याप्रसंगी माजी मंत्री गिरीष महाजन म्हणाले, दिल्लीतून देखील पक्षाने भाईंचे प्राधान्याने नाव पुढे केले. आपला विजय 100 टक्के नक्की आहे, सर्वांनी मताधिक्यासाठी प्रयत्न करावे. सर्व मतदार यांना सोबत घेऊन आपण काम करावे, भाई सर्व पक्षाला घेऊन चालतात, असेही महाजन म्हणाले.
माजी मंत्री जयकुमार रावल म्हणाले, भाजपा कार्यकर्ते परिश्रमातून पुढे आले आहेत, अनेक ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. विधान परिषदेत भाई यांच्या सारखे तज्ज्ञ व्यक्तींची गरज आहे. महाराष्ट्रात ही रेकॉर्ड ब्रेक निवडणूक होईल, असा विश्वास देखील रावल यांनी व्यक्त केला. माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, सर्वपक्षीय भाईंचे मित्र आहेत. त्यांचे सर्वच क्षेत्रात कार्य मोठे आहे. भाईंना सर्वजण ओळखतात. त्यांचे कार्य उज्ज्वल आहे. असे नेतृत्व निश्चित मोठ्या मतांनी निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री अमरिशभाई पटेल म्हणाले, भाजपा हा विचारधारा असलेला पक्ष आहे. माझे घर सर्वांसाठी खुले आहे. सार्वजनिक जीवनात सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले. दोन्ही जिल्ह्यात विकासकामे करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील आहे. आपण सर्वांनी सहकार्य करावे. एक परिवार म्हणून आपण काम करु या. धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे महापौर प्रदीप कर्पे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, धुळे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी मनोगत व्यक्त करून भाईंना पाठिंबा देत मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.