नंदुरबार – केंद्रातील भाजप सरकार आरएसएस प्रणित सरकार असून हे सरकार देशातील संविधान संपविण्याचा प्रयत्न करीत आहे; असा आरोप करीत भीम आर्मी चे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट चंद्रशेखर आजाद यांनी संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.
संविधान जनजागृती यात्रा अंतर्गत भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट चंद्रशेखर आजाद यांची जाहीर सभा नंदुरबार शहरातील पोलीस कवायत मैदानावर आज दिनांक 23 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री सात वाजता संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे, कोअर कमिटी मेंबर राजू झनके, राज्य संघटक दीपक भालेराव, कार्याध्यक्ष सुनील गायकवाड, प्रभारी दत्तू मेढे, जिल्हाध्यक्ष संजू रगडे, उपाध्यक्ष रईसअली, अमोल पगारे, रवी रगडे, लोंटन पेंढारकर, भैय्यासाहेब पिंपळे, मुन्ना येलमार, मौलाना जकारीया, मौलाना अखलाख, शाहेब शेख, राहूल प्रधान आदी उपस्थित होते. सुरुवातील नाटय मंदिरापासून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीत आदिवासी नृत्यही सादर करण्यात आले. या रॅलीचे रुपांतर तालुका क्रीडा संकुलाच्या आवारात जाहीर सभेत झाले.
दुपारी 2 वाजेची नियोजित वेळ असतांना सभा थेट 5.30 दरम्यान सुरु झाली. भर उन्हात तिष्ठत बसलेले अनेक श्रोते आणि पत्रकारही त्यामुळे कंटाळले होते. नंतर तासभर केलेल्या भाषणात आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकार यांच्यावर प्रखर टीका केली. जनतेचे म्हणे न ऐकणारे राज्यकर्ते हुकूमशहाच असतात, अशा शब्दात प्रहार करून आझाद पुढे म्हणाले की, हे सरकार देशातील संविधान संपविण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून लोकांना जागरुक करण्यासाठी ही संविधान यात्रा काढण्यात आली आहे. देशातील ८५ टक्के बहूजन समाजात परिवर्तन घडविण्याची ताकद आहे. मात्र, बहूजन समाज संघटीत नाही.
मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना आझाद म्हणाले की, केंद्रातील भाजप सरकार शेतकरीविरोधी आहे. आगामी उत्तर प्रदेश, पंजाब व हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तीन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. तथापि पंतप्रधान मोदी यांचा भरवसा नाही ते पुन्हा लागू करू शकतात. कृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनात मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची माफी मागावी व त्यांना न्याय द्यावा, असे चंद्रशेखर आझाद म्हणाले.
कंगनाला पद्मश्री पुरस्कार दिला त्या ऐवजी महात्मा फुले, राजर्षी शाहू यांना भारत रत्न द्या; अशी मागणी यावेळी त्यांनी केली. राज्यात झालेल्या भीमा कोरगाव दंगल प्रकरणात अटक असलेल्या सर्व बहुजन बांधवांची सुटका करावी, महात्मा ज्योतीबा फुलेंचा स्मृतीदिन सरकारने शिक्षण दिन म्हणून घोषीत करावा; अशाही मागण्या चंद्रशेखर आजाद यांनी मांडल्या.