नंदुरबार – दिवसा घरफोड्या करीत नंदुरबारला हादरवून सोडणाऱ्या आंतर राज्यीय टोळीतील २ अट्टल गुन्हेगारांना पुणे येथून मोठ्या शिताफीने पकडून स्थानिक गुन्हे शाखेने विशेष कामगिरी बजावली. यात महत्त्वाची बाब अशी की, पसार होताना अट्टल गुन्हेगार सोडून गेलेल्या कारमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची एक नोंद हाती लागली आणि केवळ तेवढ्यावरून पोलिसांना पूर्ण प्रकरणाचा छडा लावून देणारी दिशा गवसली.
जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी या कामगिरीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. दिवसा घरफोडीचे गुन्हे करुन धुमाकुळ घालणाऱ्या आंतर राज्यीय टोळीतील आरोपी नामे शैलु ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा वय ४० रा. हनुमान मंदीर जवळ, चाणक्यपुरी मिहीर ता. जि. सिहोर मध्य प्रदेश, आणि संतोषसिंग सौदागरसिंग (मोने पंजाबी) वय ४० रा. राजीव गांधी नगर सेक्ट-A, EWS, घर नंबर-२२४ अयोध्या रोड, पिपलाणी भोपाल मध्य प्रदेश असे दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून १० लाख १० हजार रुपये किमतीचे २१ तोळे सोनचे दागिने, चांदीचे दागिने १५ हजार रुपये रोख २ हजार रुपये किमतीचे मोबाईल व ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण १३ लाख ७७ हजार ३३५ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आणखी चार गुन्हे उघड होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की, मागील काही दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यात दिवसा घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी कठोर प्रतिबंधक कारवाई करण्याचे सक्त निर्देश दिले. तसेच गुन्हे कशा प्रकारे उघडकीस आणावेत याबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या.
दिनांक १०/११/२०२१ रोजी नंदुरबार शहरातील रुखमाई नगर येथे दिवसा किशोर माणिक रौंदळ यांचे घराचे कुलूप तोडून १० हजार रुपये रोख व २ लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेले. पोलीस तेथील घटनास्थळाची पाहणी करीत असतांनाच देवचंद नगर येथे रजनी सुरेश मंगळे यांच्याकडे देखील घराचे कुलुप तोडुन २० हजार रुपये रोख व ६ लाख ५२ हजार ३०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरीस गेले. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे पथकासह देवचंद नगरकडे जात असतांना त्यांना एक राखाडी रंगाचे MH-१८ पासिंगचे अनोळखी चारचाकी वाहन दिसले त्यांचा संशय आल्याने पाठलाग केला. त्या वाहनाचा पाठलाग करीत असतांना संशयीतांनी दोडाईचा येथून वाहन सारंगखेडाकडे वळवले. तिथे एका शेतात झाडाला ठोकले गेल्यामुळे संशयीतांनी चारचाकी वाहन सोडून पळ काढला. रात्रभर शोध घेवूनही ते सापडले नाही.
मात्र ते टाकून गेलेल्या चारचाकी वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये वाहनाचे कागदपत्र कपड्यांची बॅग, दवाखान्याचे कागदपत्र व घरफोडी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे टॅमी हत्यार, इतर साहित्य आणि एक मोबाईल मिळाला. त्यात काही लसीकरणाच्या नोंदी आढळल्या व तेवढ्यावरून निरीक्षक कळमकर यांनी तपासाची दिशा ठरवली.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार केले. दिनांक ११/११/२०२१ रोजी एक पथक मध्य प्रदेश राज्यातील भोपाल, इंदौर, सिहोर जिल्ह्यात तर एक पथक पुणे येथे संशयीत आरोपीतांचा शोध घेण्यासाठी रवाना केले. शेजारील जिल्ह्यांमध्ये दिवसा घरफोडीच्या दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठीही एक पथक रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोपाळ, इंदौर, सिहोर, रायसेन, ओबेदुल्लागंज मध्य प्रदेश राज्यात सलग ८ दिवस शोध घेऊनही दोन्ही संशयीत आरोपींचा ठाव ठिकाणा मिळाला नाही. दरम्यान, पुणे येथे सलग ८ दिवस संशयिताच्या घराच्या आजू-बाजूस वेशांतर करून नजर ठेवली. बातमीदारांचे जाळे निर्माण केले. संशयीताची पत्नी व तिचा एक मित्र अशांना ताब्यात घेतले पण काही एक उपयुक्त माहिती त्यांच्याकडून मिळाली नाही. दिनांक २२/११/२०२१ रोजी मुख्य संशयीत आरोपी हा त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी सायंकाळी गोपाळपट्टी, मांजरी याठिकाणी येणार असल्याची खात्रीशिर बातमी मिळताच पथकाने सापळा लावला. तेव्हा त्याने त्याठिकाणाहून पळ काढला. पथकाने त्याचा सुमारे १ किलो मिटर पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव शेलू ऊर्फ शैलेंद्र रामचरण विश्वकर्मा वय ४० रा. हनुमान मंदीर जवळ चाणक्यपुरी सिहोर ता. जि. सिहोर मध्य प्रदेश असे सांगितले. त्याच्या साथीदारांसह या घरफोड्या केल्याचे त्याने सांगितले. त्याच्या दुसऱ्या साथीदारास पकडण्यासाठी हे पथक लगेच शिक्रापूर जि. पुणे येथे गेले. संतोषसिंग सौदागरसिंग (मान पंजाबी) वय ४० रा. राजीव गांधी नगर, सेक्ट A, EWS, घर नंबर-२२४ अयोध्या रोड, पिपलाणी सोपाळ मध्य प्रदेश यास ताब्यात घेतले. दोघांनी आपसात वाटून घेतलेले नंदुरबार येथून चोरी केलेले सोने चांदीचे दागिनेही हस्तगत करण्यात आले.
गुगल मॅपद्वारे हेरायचे घरफोडीचे ठिकाण
यापूर्वी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथे घरफोडीचे गुन्हे त्याचे भोपाल, सिहोर मध्य प्रदेश येथील साथीदारांच्या मदतीने केले असल्याचे सांगितले. त्याबाबत रेकॉर्ड तपासले असता शैलेंद्र विश्वकर्मा विरुद्ध घरफोडीचे एकूण ६३ गुन्हे दाखल त्यात त्यास अटक देखील झालेली आहे. तसेच संतोषसिंग यावर खूनाचा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात त्याने १४ वर्ष ३ महिने भोपाळ येथील कारागृहात कारावासाची शिक्षा भोगलेली आहे. ताब्यात घेण्यात आलेला संतोष विश्वकर्मा यास विचारपूस केली असता त्याने अत्यंत धक्कादायक माहिती दिली. गुगल मॅपद्वारे शहराचा शोध घेवून त्याठिकाणी जायचे. तेथील नव्याने तयार झालेल्या वसाहती शोधून एकांतातील बंद घरे हेरायचे आणि एकसोबत ४ ते ५ घरफोडी करायचे व तेथून पळ काढायचा.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे अभिनंदन करून तपास पथकाला विशेष रोख बक्षीस जाहीर केले. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक गोरे, महिला पोलीस हवालदार पुष्पलता जाधव, पोलीस नाईक राकेश वसावे, पोलीस अमंलदार विजय डिवरे, अभिमन्यु गावीत व संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.