नंदुरबार (प्रतिनिधी) – राज्यातील जनतेच्या व्यथा जाणून घ्यायला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही आणि तीन तिघाडा सरकारमध्ये एकवाक्यताही नाही. म्हणून भाजपाची सत्ता स्थापन करण्या शिवाय महाराष्ट्राला तरणोपाय नाही, असे स्पष्ट करतानाच नुसती भविष्यवाणी नाही तर आता खरोखर भाजपाचे सरकार येणारच” अशा शब्दात विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी ठाम विश्वास व्यक्त केला.
शहादा येथील सातपुडा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानिमित्त आज ते नंदुरबार दौऱ्यावर आले होते. गळीत हंगामाचा शुभारंभ आटोपल्यानंतर नंदुरबार येथील भाजपा जिल्हा कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला आमदार राजेश पाडवी,माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी उपस्थित होते.
दरेकर पुढे म्हणाले की, नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. कोरोनासारख्या महामारीच्या काळात राज्यशासनाने लोकांना वाऱ्यावर सोडले. आदिवासींना लॉकडाऊन काळात खावटी मिळाली नाही. सरकारला आदिवासींच्या प्रश्नांपेक्षा समीर वानखेडे मोठा प्रश्न वाटला.
दरेकर याप्रसंगी म्हणाले की, आघाडी सरकारसाठी कोरोना संकट म्हणजे जणू पर्वणीच ठरली होती. या काळात आदिवासींना खावटी अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र या लाभार्थ्यांच्या खात्यात अजूनही पैसे पडलेले नाही. गेल्या दोन वर्षात आघाडी सरकारने आदिवासींच्या हिताचे कोणतेही काम केले नाही. उलटपक्षी बंद पडलेले कारखाने आणि त्यांची जमीन कमी भावात विकत घेऊन ते कारखाने पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे ईडी सारख्या यंत्रणा अशा नेत्यांच्या मागे लागल्या, असा टोला लगावून ते पुढे म्हणाले की एकंदरीत महाराष्ट्रातील जनतेचा पूर्ण भ्रमनिरास झाला असून त्यामुळे भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेत येईल.