नंदुरबार – वावद गावात दोन घरफोड्या झाल्या असून 7 लाख रुपयांहून अधिक किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे. घरफोड्या करणारी आंतरराज्यीय टोळी पोलिसांनी चार दिवसापूर्वीच पकडली. या पार्श्वभूमीवर झालेल्या या घरफोड्या म्हणजे चोरांनी पोलिसांना पुन्हा दिलेले आव्हान मानले जात आहे.
वावद गावातील घरफोडी संदर्भात खटुबाई हरचंद जावरे वय ६२ धंदा घरकाम रा. वावद यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 27 नोव्हेंबर 2021 रोजी रात्री साडेबारा ते पहाटे सहा वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खटूबाई जावरे या बाहेरगावी त्यांच्या नातजावयाच्या घरी खांडबारा ता. नवापूर येथे गावी गेल्या होत्या. घरी मुलगा व सुन होते. काल 27 रोजी रात्री या घराला कडीकुलुप लाऊन ते दोघे बाजुच्या घरात झोपले. रात्री चोरांनी संधी साधून कुलुप लावलेल्या दरवाजाची कडी कापून घरात प्रवेश केला व घरातील भिंतीलगत ठेवलेल्या लोखंडी पेटीतील रोख रक्कम सोन्या- चांदीचे दागिन्यांसह चोरून नेले. तसेच त्यांच्याच गल्लीत राहणारी फिर्यादी यांची मोठी सुन पुष्पाबाई संतोष जावरे हे घरात कुलुप लावून शेतात राहत असल्याने त्यांचे देखील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून त्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार करीत आहेत. दोन्ही घरातील एकूण 99 हजार 500 रुपयांचे चांदीचे दागिने, 2 लाख 36 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि 3 लाख 85 हजार रोख रक्कम चोरीस केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.