नंदुरबार (योगेंद्र जोशी) – नर्मदा काठच्या दुर्गम भागातील मांडवा प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या 1 किमी अंतरावरील डनेल गावाच्या सुजावपाडा येथील रहिवासी जोलाबाई अमरसिंग पाडवी (वय वर्षे 25) या नवतरुण विवाहितेचा बाळंतपणानंतर काही तासातच मृत्यू झाला. तिच्या अस्वस्थ प्रकृतीला प्राथमिक आरोग्य केंद्र सावरू शकले नाही, ग्रामीण रुग्णालयात प्रभावी उपाय मिळू शकला नाही शिवाय पोटाला चिमटा देऊन भाडे खर्च करून धावपळ करणाऱ्या तिच्या नातलगांनी जिल्हा रुग्णालयापर्यंत आणल्यावर जिल्हा रुग्णालय देखील तिला वाचवू शकले नाही. दुर्गम भागातील आरोग्याविषयीचे अज्ञान, उपचार मिळण्यात येणारे भौगोलिक व तांत्रिक अडथळे आणि आरोग्य यंत्रणेतील अपूर्णता आणखी किती दिवस बाळंतपणातील मृत्यू घडवत राहणार ? हा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर रुग्ण कल्याण समितीच्या कारभाराकडेेही लक्ष वेधलेेे गेले आहे.
दुर्गम भागातील महिलांचे बाळंतपणा दरम्यान होणारे मृत्यू थांबणार कधी ? जोलाबाईच्या मृत्यूने दुर्गम आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह
जोलाबाई पाडवी यांच्या नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार गर्भारपणामुळे काही दिवसांपासून तिला त्रास होता. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे प्रवासखर्च करून दवाखान्यात नियमित जाता आले नाही. अशात त्रास अधिक वाढला म्हणून दि. 26 नोव्हेंबर 2021 रोजी खाजगी वाहनाने मोलगी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे या महिलेने एका बाळाला जन्म दिला. परंतु प्रकृती अधिक चिंताजनक बनली. म्हणून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिथून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रेफर केले. तेव्हाही सरकारी वाहन त्यांना उपलब्धध झाले नाही. पदरमोड करीत नातलगांनी धावपळ केली व जोलाबाईला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आणले. पण जिल्हा रुग्णालयात उपचार घेताना दि. 26 नोव्हेंबर रोजी रात्री 7 वाजे दरम्यान जोलाबाईची प्राणज्योत मालवली.
त्यानंतर दिनांक 27 नोव्हेंबर 2021 रोजी जोलाबाईचा मृतदेह 6 हजार रुपये भाडे देऊन खाजगी अंबुलन्सनेच डनेल सुजवापाडा येथे नेण्यात आला व दफन विधी करण्यात आला.
मृत्यूच्या काही तास आधी या जोलाबाईने जन्माला घातलेल्या अवघ्या एक दिवसीय जिवंत लहान बाळाचे भविष्य जणू तिथे दफन केले गेले. आरोग्य यंत्रणेतील ढिसाळपणा आणखी किती बाळांचे भविष्य दफन करणार आहे ? असा संतप्त प्रश्न त्या प्रसंगी काही जणांनी उपस्थित केला. साधे बाळंतपण सुरक्षीत करण्या ईतपतही अक्कलकुवा-धडगावमधील आरोग्य यंत्रणा सक्षम नाहीत का ? कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या आरोग्य केंद्रांमधून कोणतीही क्रिटिकल केस हाताळण्या इतपत सक्षम महिला व बाल रोग तज्ञ उपलब्ध का ठेवले जात नाहीत ? सरकारी वाहने उपलब्ध का नसतात ? असे मुद्दे या प्रकरणामुळे ऐरणीवर आले आहेत.
गरोदर महिलांची प्रकृती खालावते किंवा बिघडते, मग त्यांना तिकडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेसा औषध उपचार मिळत नाही म्हणून तळोदा किंवा धडगाव येथील रुग्णालयात रेफर केले जाते, नंतर त्या अत्यवस्थ होतात म्हणून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रेफर केले जाते; असा क्रम अनेक महिला रुग्णांच्या संदर्भात निदर्शनास येत असतो. त्यातील काही गर्भवती महिला प्रवासात दगावणे किंवा वेळेवर उपचार मिळाले नाही म्हणून रुग्णालयात मरण पावणे किंवा बाळंतपण झाल्यावर रुग्णालयातच मरण पावणे; असेही घडत असते. प्रकृती अशक्त असणे, रक्तदाब वाढणे-घटणे, रक्तस्त्राव होणे, अशी विविध कारणे बाळंतपणा दरम्यान मृत्यू होणाऱ्या महिलांविषयी नोंदवलेली आढळतात. तथापि योग्य उपचार वेळेवर मिळत नसल्याने बाळंतपणा दरम्यान दुर्गम भागातील महिला रुग्ण दगावण्याचे प्रमाण बऱ्यापैकी असल्याचे निदर्शनास येते. आरोग्य विभागाला वेगवेगळ्या योजनांसाठी तसेच रुग्णालये उभारण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी प्राप्त होत असतो मात्र, या प्राथमिक गोष्टींची पूर्तता होताना दिसत नाही. प्रशासन या घटना गांभीर्याने घेत नाही; अशा अनेक गोष्टींकडे दुर्गम भागातील कार्यकर्ते लक्ष वेधू लागले आहेत.