नंदुरबार – शहरातील तसेच ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रांवर गेल्या दोन दिवसात अचानक लोकांनी गर्दी केली असून मोठाल्या रांगा लागायला लागल्या आहेत. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरूपातील विषाणूची धास्ती जनतेत वाढत असल्यामुळे आतापर्यंत ओस पडलेले लसीकरण केंद्र भरगच्च दिसू लागले आहे.
एरवी रोज जाहीर आवाहने होऊन सुद्धा लोक लसीकरण केंद्राकडे वळत नव्हते. सर्व बाजारपेठा खुल्या झालेल्या पाहून तसेच सगळ्या ठिकाणी वाढलेली वर्दळ पाहून जवळपास कोरोना नष्ट झाल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली होती. परंतु आफ्रिका खंडातून ‘ओमिक्रॉन’ या नव्या विषाणूचा प्रसार होत असल्याचे वृत्त थडकल्या पासून प्रत्येक जण आपली सुरक्षा शोधू लागला आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरूपातील विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याच्या बातम्यांमुळे लोकांच्या मानसिकतेवर चांगलाच परिणाम केल्याचे पाहायला मिळते. यामुळे तसेच राज्य आणि केंद्र प्रशासनाने सुद्धा कडक भूमिका घेतली. जे लसीकरण करणार नाहीत त्यांच्या सार्वजनिक ठिकाणच्या उपस्थितीवर निर्बंध घालायला शासनाकडून सुरुवात झाल्यामुळे सर्व लसीकरण केंद्रांवर रांगा वाढू लागल्या आहेत.
दरम्यान नंदुरबार नगर परिषदेचे मुख्य अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी स्वतः शहरातील लसीकरण केंद्रांवर भेट देऊन पाहणी केली. नगरपरिषदेची यंत्रणा सातत्याने लोकांशी संपर्क करून आवाहन करीत आहे हे त्याला लोकांचा प्रतिसाद वाढला असून दोन दिवसातील लसीकरण याची संख्या वाढली आहे असे मुख्याधिकारी शिंदे म्हणाले
.. अन्यथा ‘अशी’ होईल दंडात्मक कारवाई
कोविड-19 विषाणूच्या प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाच्या अटी व शर्तींचे नागरिकांनी पालन करावे. असे आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोविड नियमांचे पालन न करणा-या व्यक्ती तसेच संस्था, आस्थापना या दंडास पात्र असतील. कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला नियम मोडल्याच्या प्रत्येक प्रसंगी 500 रुपये इतका दंड करण्यात येईल. अभ्यागत, ग्राहक, इत्यादीवर कोविड अनुरूप वर्तन ठेवणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही जागेत किंवा परिसरात जर एखाद्या व्यक्तीने नियम मोडल्याचे दिसून आले तर, त्या व्यक्तीवर दंड लादण्या व्यतिरिक्त, अशा संस्थाना किंवा आस्थापनांना सुद्धा 10 हजार रुपये इतका दंड करण्यात येईल. जर एखाद्या संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतःच कोविड अनुरूप वर्तनाचे पालन करण्यात कसूर केली तर ती प्रत्येक प्रसंगी 50 हजार इतक्या दंडास पात्र असेल.
वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत ती संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल. जर कोणत्याही टॅक्सीमध्ये किंवा खासगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरूप वर्तनात कसूर केली जात असल्याचे आढळून आले तर, कोविड अनुरूप वर्तनात कसूर करणाऱ्या व्यक्तींना 500 रुपये इतका दंड करण्यात येईल. तसेच सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील 500 रूपये इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, 10 हजार रुपये इतका दंड करण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास, एक आपत्ती म्हणून कोविड-१९ ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लायसन काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन बंद करण्यात येईल.
राज्य शासनाने व केंद्र सरकारने वेळोवेळी निर्धारित केलेल्या कोविड अनुरूप वर्तनाचे (CAB), सेवा प्रदाते, परिवास्तुंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक, इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यागत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी, इत्यादींनी काटेकोर पालन केले पाहिजे, यांचे उल्लंघन केल्यास कोविड अनुरूप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.