अनोखी श्रद्धांजली !..शहीद पोलीस जवानांच्या स्मृत्यर्थ  वंचित महिलांचे आज सामुहिक ‘शुभमंगल’ 

नंदुरबार – 26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ  दुर्लक्षित व वंचित एड्सग्रस्त महिलांच्या विवाह गाठी जुळवून देण्याचा अनोखा उपक्रम निवृत्त पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे हे मागील 13 वर्षापासून अखंडपणे राबवत असून हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम कौतुकाचा विषय बनला आहे.

ही परंपरा जारी ठेवत आज 1 डिसेंबर रोजी देखील असाच दुर्लक्षित व वंचित महिलांच्या विवाह गाठी बांधून देण्याचा अनोखा मोठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आयोजकांनी ही माहिती देताना सांगितले की, बुधवार दिनांक  1 डिसेंबर 2021 रोजी एच.आय.व्ही.सह जगणाऱ्या अविवाहित, घटस्फोटित, परित्यक्ता, विधूर, जन्मतःच बाधित असलेल्या व समाजाने दुर्लक्षित केलेल्या वंचितांचे विवाह लावून त्यांचे कौटुंबिक जीवन फुलविणार आहेत. या दिवशी जागतिक एड्स दिन आहे. त्याचे औचित्य साधून एड्स जनजागृतीसाठी देखील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक जाणिवेतून होत असलेल्या या विवाह सोहळ्याला जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहतील. कानळदा ता.जि.जळगाव येथे आज दि.1/12/2021 बुधवार  रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होईल, असे आयोजकांनी कळविले आहे.  सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक व सध्या कानळदा ता.जि.जळगाव येथील ग्रामपंचायत सरपंचपदी कार्यरत असलेले पुंडलिक सपकाळे हे मागील 13 वर्षापासून सन 2008 पासून शहिद हेमंत करकरे व 26 /11 च्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून वंचित व्यक्तींचे सहजीवन फुलवणारे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. पोलीस सेवा बजावत असल्यापासून सातत्याने पोलीस मित्रांचे सहकार्य घेत असे कार्य ते करत आले आहेत.
मागिल वर्षी सपकाळे हे पोलीस सेवेतून सेवानिवृत्त झाले. तथापि सेवा निवृत्ती नंतरही त्यांनी कार्य चालू ठेवले. आपल्या मूळ गावातील उत्साही तरुणांची तसेच त्यांच्या काही पोलीस अधिकारी कर्मचारी मित्रांची व कर्तव्य ग्रुप कानळदा यांची सपकाळे यांना या कार्यासाठी साथ लाभली आहे. एन.एम. पी. प्लस, पुणे, कर्तव्य गृप, कानळदा, आधार बहुउद्देशिय संस्था, जळगाव आणि नेटवर्क ऑफ नंदुरबार, जयभवानी मित्र मंडळ, कानळदा यांनी आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असून यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!