नंदुरबार – कोणीतरी आयशर ट्रकच्या काचा फोडल्यामुळे संतप्त झालेल्या चार जणांनी थेट ट्रक आडवे लावून अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील वाहतूक अडवून मोठा राडा घडवला. गुजरात सीमेलगतच्या गुलीउंबर आरटीओ तपासणी नाक्याजवळ हा प्रकार मध्यरात्री घडला. अक्कलकुवा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पहाटे वाहतूक सुरळीत केली. परंतु आयशर ट्रकच्या काचा कोणत्या कारणाने फुटल्या आणि एवढे नाट्य घटनेचे मूळ कारण काय हे मात्र गुलदस्त्यात आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समाधान गोपाल निकम रा. भामरूड राणीचे ता. पाचोरा जि. जळगावत, श्रीकृष्ण विठ्ठल बिरारी, योगेश शालीग्राम बावीस्कर रा. पाळधी ता. धरणगाव जि. जळगाव, दिलीप प्रभाकर माळी रा. पाळधी दोणगाव ता. धरणगाव जि. जळगाव हे चारही जण आयशर ट्रकने दि. 1 डिसेंबर 2021 च्या रात्री अंकलेश्वर – बऱ्हाणपुर हायवेने जात होते. तेव्हा हायवेवर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या गुलीउंबर शिवारात आर. टी. ओ. चेक पोस्टजवळ ते थांबले. तिथे गुजरात हद्दीच्या बाजूने असलेल्या हॉटेल अंबिका समोर उभ्या असलेल्या त्यांच्या आयशर क्र. MH-१९ CY-५५५६ आणि MH-१९ CY- २४०३ या दोन्हीही आयशर ट्रकच्या काचा कोणीतरी अज्ञात इसमांनी खोडसाळपणाने फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरून संतप्त्त झालेल्या या चारही जणांनी चेक पोस्ट नाक्यावरील अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. काचा फोडणाऱ्यांना त्वरित शोधून अटक करा, असा आग्रह तिथे उपस्थित पोलिसांकडे करू लागले. संबंधित अधिकाऱ्यांनी आधी संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल करा मग पुढील कारवाई करता येईल, अशी समजूत संबंधित अधिकाऱ्यांनी काढली. परंतु समाधान झाले नसल्यामुळे या संतप्त चारही जणांनी आपले दोन्ही आयशर ट्रक थेट रस्त्यावर आडव्या लावून दिल्या. यामुळे शेकडो ट्रक खोळंबून होत्या.
तीन राज्यांना जोडणारा महामार्ग असल्यामुळे मिनिटाला असंख्य जड वाहने व प्रवासी वाहने येथून वेगाने धावत असतात. ट्रक आडवे लावल्यामुळे ती सर्व वाहतूक खोळंबून राहिली. भर पावसात रात्रीच्या साडे बारा वाजेपासून पहाटे साडे तीन पर्यंत हे नाट्य हायवेवर चालू होते. अखेर अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिंगटे यांनी दखल घेऊन कारवाई केली. चारही जणांना अटक करुन वाहतूक सुरळीत केली.
शिपाई अविनाश रंगाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या चारही जणांविरुद्ध बेकायदेशीर प्रतिबंध केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. दोन्ही आयशर ट्रक- हायवेवर आडव्या लावून जाणारे व येणारे वाहनांना जाण्या येण्यासाठी प्रतिबंध करून दोन्ही बाजुची वाहतुक जाम करून तेथे लोकांची गर्दी जमा करून मा. जिल्हाधिकारी सो. नंदुरबार यांचे कडील जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीसनायक देविदास विसपूते करीत आहेत.