नंदुरबार – जिल्ह्यात चालू असलेला अवकाळी पाऊस, निर्माण झालेले प्रचंड धुके आणि अचानक वाढलेला गारठा यामुळे शेतपिकांची नासाडी झाली. त्याच बरोबर काही ठिकाणी घरांची पडझड सुरू झाली आहे तर काही गावांमध्ये गारठ्याने मेंढ्या मरू लागल्या आहेत. नंदुरबार तालुक्यात 25 हून अधिक मेंढ्या मरण पावल्या तर अमळथे गावात तीन घरांची पडझड झाली आहे. नंदुरबार येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार तलवाडा येथे 4, खर्दे खुर्द येथे 4 आणि मांजरे येथे 15 मेंढ्या पावसात भिजून व गाठा सहन न झाल्यामुळे मरण पावल्या.
मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. पुरेसा सूर्यप्रकाश पडलेला नाही. धुके मिश्रित वातावरणाचा परिणाम पिकांवर झाला. अशातच दोन दिवसापासून ठिकाणी सरी कोसळत आहेत. सतत चिखलात उभे राहिल्यामुळे आणि असह्य गारठ्यामुळे मेंढ्या मारायला सुरुवात झाली आहे. तळोदा शहादा नवापूर आणि नंदुरबार या तालुक्यातील ज्वारी बाजरी कापूस मका तुर या पिकांना जबर फटका बसला. पपई आणि मिरचीच्या व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना जबर फटका बसला. नवापुर तहसीलदार कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यात 673 शेतकऱ्यांच्या 490 हेक्टरवरील पिकाची हानी झाली आहे.