आज शनिअमावस्या; शनिमांडळला भाविकांनी घेतली धाव

नंदुरबार : आज शनिवार दिनांक 4 डिसेंबर 2021 रोजी अमावस्या आहे. शनिवारची अमावस्या म्हणून तिला ‘शनि अमावस्या’ असे संबोधले जाते व वर्षातून मोजक्या प्रसंगी असा योग येतो म्हणून या अमावस्येचे धार्मिक व अध्यात्मिक महत्त्व देखील अधिक असते. यामुळेच नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ या जागृत देवस्थानी भाविकांची यात्राच भरते व अलोट गर्दी होत असते. कोरोना मुळे मागील दीड वर्ष हेे सर्व थांबलेले होते. परंतु यंदा भाविकांना दर्शनाची व पुजनाची संधी दिली जाईल, असे विश्वस्त मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधक नियमांच्या पार्श्वभूमीवर भक्तांना आज मिळणारी ही मुभा महत्त्वाची ठरू शकते.

नंदुरबार जिल्ह्याच्या ठिकाणापासून १८ कि.मी.अंतरावर दक्षिणेस शनिमांडळ गाव आहे. दर शनिआमावस्येला शनिदेवाची यात्रा भरते. या यात्रेस गुजरात, मध्यप्रदेश तसेच धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या ठिकाणाहून भाविक येत असतात. कोरोना काळामुळे मागील २० महिन्यापासून शनिभक्त हे शनिच्या दर्शनापासून वंचित होते. यावेळेस मात्र शनिमांडळ येथे शनिभक्तांचा मेळा भरणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांनी कोरोनाचे नियम पाळून शनि दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शनैश्वर विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
हे आहेत पौराणिक संदर्भ
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे शनि देवाचे पुरातन मंदिर आहे. येथील स्वयंभू मूर्ती प्रकट झाल्याची आख्यायिका आहे. राजा विक्रमादित्य यांनी साडेसातीच्या कालावधीत शनिमांडळ परिसरात काही काळ व्यतीत केला होता, अशी आख्यायिका आहे. त्याअनुसरून काही पुरावे म्हणून या परिसरातील काही गोष्टी दाखवल्या जातात. विक्रमाची साडेसाती संपल्यानंतर शनिमांडळ गावी येऊन शनि महाराजांनी राजा विक्रमास प्रत्यक्ष दर्शन दिले व साडेसातीतून मुक्त केल्याची कथा आहे. यामुळे शनिमांडळ गावास कलियुगातील साडेसाती मुक्तीचे स्थान मावले जाते.
म्हणून अनन्य साधारण महत्व आहे. परंतू त्याकाळी भौगोलिकदृष्ट्या विकसित नसल्यामुळे शनिमांडळ हे स्थान प्रसिद्धीच्या झोतापासून उपेक्षित राहिले, असा दावा जाणकार करतात.
 दरम्यान, तालुक्याचे विद्यमान आ.डॉ.विजयकुमार गावित तथा तत्कालीन पर्यटनमंत्री आ.जयकुमार रावल यांनी शनिमांडळ गावास तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि पर्यटन खात्यातून निधी देखील उपलब्ध करुन दिला. त्यामुळे शनिमंदिर परिसरात भव्यदिव्य वास्तू उभारलेली पहायला मिळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp
error: Content is protected !!