नंदुरबार – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात नंदुरबार पोलीसांनी धडक कारवाई केली असून 2 वाहन चालकांचे परवाने 6 महिन्यांसाठी तर, 5 वाहन चालकांचे परवाने 3 महिन्यांसाठी निलंबीत केले आहेत.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत निदर्शनास आले की, या वर्षी रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. ही बाब चिंताजनक असल्यामुळे दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या चालकांविरुध्द् नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत विशेष मोहिम दिनांक 24/10/2021 रोजी राबविण्यात आली होती. या मोहिमेत काही वाहन चालकांनी मद्यपान केलेले आढळून आले. नवापुर पोलीस ठाणे- 07, शहादा पोलीस ठाणे-05. शहर वाहतुक शाखा, नंदुरबार -05 नंदुरबार तालुका पोलीस ठाणे-04, नंदुरबार शहर पोलीस ठाणे 04, धडगांव पोलीस ठाणे 04, अक्कलकुवा पोलीस ठाणे-03, विसरवाडी पोलीस ठाणे-02. सारंगखेडा पोलीस ठाणे 02, तळोदा पोलीस ठाणे-02, उपनगर पोलीस ठाणे-02. मोलगी पोलीस ठाणे-01 म्हसावद पोलीस ठाणे-01, असे एकुण 42 गुन्हे मद्यपी चालकांवर नोंदविण्यात आले. तसेच त्यांचे परवाने निलंबीत करण्याची प्रक्रीया नंदुरबार जिल्हा पोलीसांकडून करण्यात आली होती.
त्या अनुषंगाने अधिक माहिती देताना पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले की, दिनांक 3 डिसेंबर 2021 रोजी उप-प्रादेशीक परिवहन अधिकारी, नंदुरबार यांनी 42 पैकी दारु पिऊन वाहन चालविणारे, अतिवेगाने वाहन चालविणारे व इतर कारणांमुळे 2 वाहन चालकांचे परवाने 6 महिण्यांसाठी तर 5 वाहन चालकांचे परवाने 3 महिण्यासांठी रद्द केलेले आहेत. तसेच उर्वरीत वाहन चालकांचे परवाने निलंबीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याशिवाय आगामी सण उत्सवाच्या काळात देखील नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अचानक दुचाकी व चारचाकी वाहन चालकांची तपासणी करुन दारु पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक, अति वेगाने वाहन चालविणारे वाहन चालक, सरकारी नोकरांवर हल्ला करणारे इसम, अवैध धंद्यांसाठी वाहनांचा वापर करणारे वाहन चालक आढळून आल्यास त्यांचेवर कडक कारवाई करुन त्यांचे वाहन परवाने निलंबीत करण्यात येतील असे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठी देखील धोकेदायक आहे. नागरीकांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये.