नंदुरबार – जिल्ह्याच्या विविध भागात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी पोलीस दलाने जोरदारपणे सुरू केली असून या अंतर्गत शनिवार रोजी दारू पिऊन वाहन चालवताना आढळलेल्या जवळपास 43 वाहनधारकांवर गुन्हे नोंदवण्यात आले.
नंदुरबार शहर, नंदुरबार तालुका, विसरवाडी, नवापूर, वण्याविहिर अक्कल्कुवा, तळोदा, प्रकाशा, शहादा, सारंगखेडा, धडगाव अशा विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. याआधीच नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांसाठी देखील धोकेदायक आहे. नागरीकांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. तरीही अनेक वाहनधारक दारू पिऊन गाडी चालवताना आढळत आहेत.
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनीही जाहीरपणे सांगितले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत अचानक दुचाकी व चारचाकी वाहन चालकांची तपासणी करुन दारु पिऊन वाहन चालविणारे वाहन चालक, अति वेगाने वाहन चालविणारे वाहन चालक, सरकारी नोकरांवर हल्ला करणारे इसम, अवैध धंद्यांसाठी वाहनांचा वापर करणारे वाहन चालक आढळून आल्यास त्यांचेवर कडक कारवाई करुन त्यांचे वाहन परवाने निलंबीत करण्यात येतील.