नंदुरबार – शहरातील रुख्माई नगर आणि देवचंद नगरातील घरफोडी उघडकिस आणली म्हणून त्या वसाहतीींमधील नागरिकांनी पोलीस अधीक्षकांसह संबंधीतांचा आज सत्कार केला. जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनीही तो आनंदाने स्वीकारला.
दिनांक १०/११/२०२१ रोजी नंदुरबार शहरातील रुख्माई नगर येथे दिवसा १0 ते १३.३० वा. दरम्यान किशोर माणिक रौंदळ यांचे घराचे कुलुप तोडून १० हजार रुपये रोख व २ लाख ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अमलदारांनी लागलीच घटनास्थळाकडे धाव घेतली. तेथील पाहणी करीत असतांनाच देवचंद नगर येथे राहणारे रजनी सुरेश मंगळे यांच्याही घरी कुलुप तोडून २० हजार रुपये रोख व ६ लाख ५२ हजार ३०० रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने घरफोडी करुन चोरून नेल्याचे समजल्याने एकच खळबळ उडाली. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर पथकासह देवचंद नगरकडे धावले. तिकडे जात असतांना त्यांना एक राखाडी रंगाचे अनोळखी चारचाकी वाहन दिसले. त्यांचा पाठलाग केला परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले. नंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदौर येथे तब्बल १२ दिवस तसेच पुणे येथे सलग ८ दिवस मुक्काम करुन गुन्ह्यातील पळून गेलेल्या दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले.
गुन्ह्यांची उकल करुन त्यांच्याकडून गुन्ह्यातील १० लाख १० हजार रुपये किमतीचे २१ तोळे वजनाचे सोन्याचे चांदीचे दागिने १५ हजार रुपये रोख, २ हजार रुपये किमंतीचे मोबाईल व ३ लाख ५० हजार रुपये किमंतीची गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन असा एकूण १३ लाख ७७ हजार ३३५ रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
नंदुरबार शहरात दिवसा झालेल्या धाडसी घरफोडीचे गुन्हे उघडकिस आणून चोरी गेलेली सर्व मालमत्ता परत मिळविल्याबद्दल नंदुरबार शहरातील रुखमाई नगर, देवचंद नगर येथील किशोर माणिक रौंदळ, दरबारसिंग कोमलसिंग गिरासे, प्रविण शांताराम सावंत, प्रा. डॉ. गिरीश पवार, श्री. जगदीश बेडसे, श्री. राजेंद्र दगा माळी, रविंद्र आनंदा अहिरे तसेच इतर ६ ते ७ रहिवासी यांनी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार दिपक गोरे, महिला पोलीस हवालदार पुष्पलता जाधव, पोलीस नाईक राकेश वसावे, पोलीस अमलदार विजय दिवरे, अभिमन्यु गावीत यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
तसेच सत्कार केलेल्या नागरीकांनी नंदुरबार पोलीसांच्या कामगिरीबद्दल अभिमान असून समाधान व्यक्त केले आहे व नंदुरबार पोलीसांच्या पुढील वाटचालीस व कामगिरीस पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या.