नंदुरबार – राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “एक वही एक पेन” हा उपक्रम स्वखर्चाने राबवून वैजाली जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील यांनी अनोख्या पद्धतीने आदरांजली वाहिली. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा; या संदेशाची आठवणही याप्रसंगी विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्याचप्रमाणे ‘जय भीम’ चित्रपट शाळेत एलईडी वर दाखविण्यात आला. त्यामुळे सर्व विद्यार्थी आनंदित झाले. दरम्यान, दिपिका महिरे या विद्यार्थिनीने भाषण केले व कविता सादर केली. यावेळी शाळेतील शिक्षक भरत पावरा, चंदू पाटील उषा पाटील, गोपाल गावित तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी सुरेखा पाटील, कविता सोमवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार भरत पावरा यांनी मानले.