नंदुरबार : कोरोनामुळे मयत झालेल्या नागरिकांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत वितरीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पोर्टल सुरु केले आहे. या पोर्टलवर दाखल करण्यासाठी लागणाऱ्या गरजेच्या आरटीपीसीआर रिपोर्ट तसेच मयत दाखल्यासाठी वारसांची फिरफिर होवू नये, यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाने एक वैद्यकीय अधिकारी नियुक्त करून कामकाज सुरु केले आहे. परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी ते रिपोर्ट हाती सोपवण्या ऐवजी चक्क त्याचा ढीग मांडून दिला आणि ज्याने त्याने पाहून घ्यावे असे सांगून हात वर केले. त्यामुळे आज दिनांक 9 डिसेंबर 2021 रोजी त्याठिकाणी रिपोर्ट शोधणाऱ्यांनी घातलेला प्रचंड सावळागोंधळ पाहायला मिळाला. सोशल मीडिया वरून त्याचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले आहेत. त्यापैकी हाती लागलेल्या व्हिडिओ मधे ‘ज्याच्या हाती ससा तो पारधी’ या न्यायाने रिपोर्ट शोधणाऱ्या नागरिकांनी चालवलेला गोंधळ आणि त्यामुळे झालेला त्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा ‘उकिरडा’ पहायला मिळत आहे.
दरम्यान, मदत देण्यासाठी शासनाने ऑनलाईन वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर जावून अनेकजण माहिती घेत आहेत. यात कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आणि मयत प्रमाणपत्र आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात सर्वाधिक चौकशी होण्याची शक्यता असल्याने रुग्णालय प्रशासनाने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ९५१ जणांची माहिती अपडेट करून ठेवली आहे. यातून त्यांच्या वारसांकडून प्रमाणपत्र मागणी करण्यात आल्यानंतर काही क्षणात ती वितरीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते.